‘मॅसॅकर आॅफ द इनोसंट्स’ : रुबेन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:38 PM2018-03-23T12:38:41+5:302018-03-23T12:38:41+5:30
पीटर पॉल रुबेन्स हा ‘फ्लेमिश’ चित्रकार होता. म्हणजे, आज ज्या देशाला बेल्जियम म्हणून ओळखतात, त्या देशाचा रहिवासी. बेल्जियम आपल्याला नक्षीदार काचेच्या वस्तूंसाठी माहीत आहे.
एकेकाळी हा प्रदेश रुबेन्सची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध होता. सतराव्या शतकाचा पूर्वार्ध हा त्याचा काळ! त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्याने एक विशिष्ट चित्रशैली अंगिकारली होती. त्याला म्हणतात, ‘बरोक्’ चित्रशैली. बरोक् म्हणजे मुळात पोतुर्गीज भाषेत ‘मोती’. या चित्रशैलीत मोत्याप्रमाणेच चकचकीत व ठळक रंग वापरले जातात आणि बरेचदा चित्राच्या कोणत्यातरी एका भागाकडून प्रकाश आलेला दाखवतात.
त्यानुसार चित्राचे शेडिंग होते. ही चित्रशैली वापरणारे अनेक असले तरी, रुबेन्सची ती ‘खासियत’ होती. त्याला त्याकाळी ‘प्रिन्स आॅफ द पेंटर्स अँड पेंटर आॅफ द प्रिन्सेस्’ असं म्हणायचे- चित्रकारांचा राजकुमार आणि राजकुमारांचा चित्रकार. पण, केवळ राजे-राजकुमारांचीच नव्हे, तर पौराणिक कथांवर आधारित चित्रे हेही रुबेन्सचे वैशिष्ट्य होते. अशीच एक पौराणिक कथा बायबलच्या नव्या करारात मॅथ्यूच्या गॉस्पेलमध्ये दिलेली आहे. त्याकाळचा ज्यूंचा राजा, ‘हेरॉड द ग्रेट’ याला ज्योतिषांकडून समजले, की ज्यूंचा नवा राजा जन्माला आला असून, तो ‘बेथलेहेम’मध्ये आहे. त्यासरशी हेरॉडने आपल्या सैनिकांचे एक पथक पाठवून बेथलेहेममधील सर्व लहान मुलांना मारून टाकण्याचा हुकूम दिला. त्यानुसार, त्या क्रूर सैनिकांनी अगदी तान्ही पोरेदेखील आयांकडून हिसकावून दगडावर आपटून मारली. या भीषण हत्याकांडाला ‘मॅसॅकर आॅफ द इनोसंट्स’ असं नाव आहे (आपल्याकडच्या कथेनुसार कंसाचा वैरी गोकुळात आहे, असं समजल्यावर कंसाने पुतनेला पाठवून हेच केले होते. आणि कृष्णाची सहा भावंडे त्याने स्वत: अशीच दगडावर आपटून मारली....क्रौर्यसुद्धा जगात किती सारखं असतं नाही?). इकडे कृष्णाप्रमाणेच येशूलाही सुरक्षितपणे इजिप्तमार्गे नाझरेथला हलवले होते. किंबहुना त्याचा सूड म्हणूनच सर्व लहान मुले हेरॉडने मारून टाकली. या हत्याकांडाच्या प्रसंगावर युरोपात अनेकांनी चित्रं काढली. पण, रुबेन्सचे चित्र सगळ्यात प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे रुबेन्सने याच प्रसंगावर दोन चित्रे काढली आहेत. पहिले सन १६१२च्या सुमारास काढले. ते सध्या ओंटारिओ (टोरंटो) येथील कलासंग्रहात आहे. दुसरे चित्र त्याने १६३८च्या सुमारास काढले. ते सध्या म्युनिक(जर्मनी) येथील कलासंग्रहात आहे. दोन्ही चित्रांकडे जर आपण निरखून पाहिले, तर आधी काढलेले (१६१२चे) चित्र अधिक प्रभावी आहे. त्यामध्ये आयांचा आक्रोश, सैनिकांचा उन्माद आणि मृत बालकांची निरागसता प्रकर्षाने जाणवते. त्यामानाने १६३८चे चित्र फारसे प्रभावी वाटत नाही. त्यात आकाशात देवदूत वगैरे दाखवल्याने मूळ घटनेची भीषणता मनावर ठसत नाही. रंगसंगतीसुद्धा आधीच्या चित्रात अधिक गडद आहे. पात्रे मर्यादित असल्याने चेहऱ्यांवरील भाव स्पष्ट दिसतात.
थोडक्यात, १६१२चे ‘मॅसॅकर आॅफ द इनोसंट्स’ हे चित्र, चित्रकार म्हणून असलेली रुबेन्सची सगळी वैशिष्ट्ये व्यवस्थित दाखवते.
- अॅड.सुशील अत्रे