भोरगाव लेवा पंचायततर्फे पाच उपवरांचे सामूहिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:54 PM2021-03-16T16:54:55+5:302021-03-16T16:57:53+5:30
दृष्टीहीन दलित जोडप्यानेही केले लग्न
भुसावळ : लेवा पंचायत शाखा भुसावळतर्फे इतिहासात नोंद होईल असा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम राबवत पाच जोडप्यांनी खर्चिक लग्न कार्याला फाटा देत सामूहिक विवाहात सात जन्माच्या रेशीम गाठी बांधल्या व या सामूहिक विवाहात दृष्टिहीन बौद्ध जोडप्यांचे लग्न कार्य पार पडले हे विशेष. सामुदायिक सोहळा संतोषीमाता मंगल कार्यालयात मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आधुनिक युगात समाजाला, नावाला शोभेल अशा पद्धतीने खर्चिक विवाह सोहळे पार पडतात. यात वेळ व पैशा मोठ्या प्रमाणात खर्च होतो, मात्र इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने भुसावळ लेवा पंचायत शाखेतर्फे जोडप्यांचे सामूहिक विवाह पार पडले. त्यात एक दलित समाजाच्या दृष्टिहीन जोडप्याचे बौद्ध रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. लेवा पाटीदार समाजाचा सामूहिक विवाह बौद्ध समाजाचा लग्न सोहळा हा प्रथमच झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
बौद्ध समाजाचे दृष्टिहीन जोडप्यांनी बांधल्या सात जन्माच्या रेशीमगाठी
नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथील वर मंगेश अशोक धीवरे व वधू दीपाली उबाले पिंपरी या दृष्टिहीन जोडप्यांना लेवा समाजातील मान्यवरांनी आशीर्वाद देऊन बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे लग्नकार्य केले. या क्षणाची नोंद इतिहासात सोनेरी अक्षरात कोरली गेली.
याशिवाय लोकेश किशोर कोल्हे (रोझोदा) व राजेश्वरी बळीराम चौधरी (पाडळसा), कौतिक सुभाष फेगडे (रोझोदा) विनिता विनोद चौधरी (खिरोदा), अक्षय रवींद्र फेगडे (दीपनगर) विशाखा विठ्ठल चौधरी( भुसावळ), हर्षल प्रमुख चौधरी (खिरोदा ) विजया विजय भोसले या जोडप्यांचेही सामूहिक विवाहात लग्न कार्य पार पडले.
तीन विवाह नाकारले
या आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह होत असताना याठिकाणी तीन नव वधू वर यांनीही विवाहाची तयारी दर्शवली. मात्र आयोजकांनी फक्त पाच विवाहाचीच परवानगी असल्यामुळे आता हे शक्य नसल्याचे सांगितले. पुढील सामूहिक विवाहात आपले विवाह पार पाडू, असे आश्वासन दिले.
यांनी घेतला पुढाकार
भोरगाव पंचायत भुसावळ शाखा शाखेचे समिती अध्यक्ष आरती चौधरी, मंगला पाटील, आरती सारंग चौधरी, सुहास चौधरी, डॉ.बाळू पाटील, शरद फेगडे, माजी आमदार नीळकंठ फालक, डिगंबर महाजन, ॲड.प्रकाश पाटील, भोरगाव पंचायत पाडळसेचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, अजय भोळे, रघुनाथ चौधरी, महेश फालक, लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश संघटक रुपेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भारंबे, शहराध्यक्ष देवा वाणी यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडले.
नवदांपत्यांना दिल्या संसारोपयोगी वस्तू भेट
या सामूहिक विवाह कार्यक्रमात पार पडलेल्या लग्न सोहळ्यातील नवदांपत्यांना आयोजकांतर्फे १५ हजारांचे संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आले यात गॅसच्या दोन शेगडीसह कुकर, पाण्याची टाकी, मिक्सर, पंखा व इतर साहित्य देण्यात आले.
लेवा समाजातर्फे आचार्याचे काम पंडित राहुल जोशी यांनी, तर बौद्ध समाजाचे लग्नकार्यासाठी बौद्धाचार्य सुनील केदारे यांनी लग्न कार्य पार पाडले.