जळगावात बालिकेच्या हत्येप्रकरणी प्रचंड मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:42 PM2018-06-16T12:42:53+5:302018-06-16T12:42:53+5:30
समतानगरातील घटना
जळगाव : समतानगरातील बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अमानवी अत्याचार करून खून केल्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शुक्रवार १५ रोजी सर्वपक्षीय नागरिकांच्या मोर्चाद्वारे करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनही सादर केले. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले.
शिवतीर्थ मैदानावरून सकाळी ११.४५ च्या सुमारास या मूकमोर्चास प्रारंभ झाला. त्यात आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, शिवचरण ढंढोरे, माजी उपमहापौर करीम सालार, अरूण चांगरे, भाजपा गटनेता सुनील माळी, खाविआचे सदस्य राजेश शिरसाठ, नगरसेवक राजू मोरे, मुफ्ती हारून नदवी, नगरसेविका कंचन सनकत, मंगला बारी, भाजपा उपाध्यक्ष वैशाली पाटील, जयप्रकाश चांगरे, वसंतराव चांगरे, दिलीप चांगरे, चेतन सनकत, आरपीआय युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, राष्टÑवादी प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, राष्टÑवादी महानगराध्यक्ष निता चौधरी, राष्टÑवादी प्रदेश सचिव लता मोरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मेहतर वाल्मिकी समाज पंचायतचे सदस्य व समाजबांधव सहभागी झाले होते.
पोलीस अधीक्षकांशी चर्चा
मूकमोर्चा प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात मयत बालिकेच्या वडिलांनी मागणी केली की, ते स्वत: शिक्षा भोगत असताना त्यांच्या मुलीच्या खुनामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे मुलीला न्याय मिळवून द्यावा. पोलीस अधीक्षकांनी शासनाकडून मदत मिळवून देण्याची व मयत बालिकेस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. समता नगरात नियमित पोलीस गस्त राहील. या आठवड्यात डीवायएसपी सचिन सांगळे समतानगरातील रहिवाशांशी समस्यांबाबत चर्चा करून म्हणणे ऐकून घेतील, असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडक
पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देऊन मयत बालिका ही मेहतर वाल्मिकी समाजाची असल्याने तिच्या कुटुंबास शासनाकडून संरक्षण व आर्थिक मदत मिळवून द्यावी. या खटल्यात शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुती करावी. हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. तसेच मयत बालिकेचे वडिल जन्मठेपेची शिक्षा भोगत असून १० दिवसांसाठी पे-रोलवर आहेत. त्यांची दीड वर्षांची राहिलेली शिक्षा रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.