अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन, आता गुन्हेगारांची खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:04+5:302021-09-25T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपययोजनांना राबविण्यास सुरुवात केली आहे. अवैध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपययोजनांना राबविण्यास सुरुवात केली आहे. अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून त्यामुळे आता शस्त्र वापरणाऱ्या गुन्हेगारांची खैर नाही, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी दिली आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन डॉ.बी.जी. शेखर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना डॉ. शेखर यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या गोळीबाराच्या घटनांची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे यापुढे जास्तीत जास्त अग्निशस्त्रे अर्थात गावठी पिस्तूल जप्त करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविली जाणार आहे. अवैध शस्त्रांविरोधातील कारवाईचे परिणाम लवकरच दृश्य स्वरूपात दिसतील असेदेखील त्यांनी सांगितले. तसेच गुरुवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे मारले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पाच वर्षातील शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड
गेल्या पाच वर्षातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू आहे. हे गुन्हेगार आता कुठे आहेत, याची माहिती घेऊन त्यांच्यावर एमपीडीए व मोका तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण होण्याच्या दृष्टीने कामकाज केले जाणार असून याप्रकरणी संपूर्ण परिणाम मिळेपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहेत.
मध्यप्रदेशातील अधिकाऱ्यांशी करणार चर्चा
जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या उमर्टी या गावातून होणारी अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. तसेच यासाठी बॉर्डर कॉन्फरन्ससह मध्यप्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून मदत घेण्यात येणार असल्याची माहितीदेखील डॉ. शेखर यांनी दिली. तसेच ब-हाणपूर, खंडवा सीमेजवळ बॉर्डर कॉन्फरन्स घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
तर पोलिसांना माहिती द्या...
अवैध खासगी सावकारीत सर्वसामान्य लोकांसह शेतकरी अडकतो. खासगी सावकार व्याजाच्या रकमेत मालमत्ता हडप करतात. कुणाला काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. तसेच ज्या व्यक्तीकडे गावठी पिस्तूल किंवा अन्य शस्त्र असतील, त्यांची माहितीसुद्धा नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुन्हेगारांकडे एक तर पोलिसांकडे अनेक हत्यार
महिला अत्याचार, छेडछाड प्रकरणी गुन्हेगारांचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू आहे. गुन्हेगारांकडे एक हत्यार असते, मात्र आमच्याकडे अनेक हत्यार असतात. त्यामुळे गुन्हेगारीची कुणाला माहिती असल्यास ती निर्धास्त देण्याचे आवाहन यावेळी डॉ. शेखर यांनी केले. तसेच तडीपार केलेल्या गुन्हेगारांची माहिती घेतली जाईल, सध्या ते कुठे आहेत. जर जिल्ह्यात आढळून येतील, तर त्यांच्या कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीस मित्र मेळावा घेण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावणार
जिल्ह्यात होणाऱ्या अनुचित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असून त्यानंतर हा ७ ते ८ कोटींचा प्रस्ताव डीपीडीसीला सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली. पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा आदी उपस्थित होते.