चटई कामगारांवर काळाचा घाला; सुसाट ऑईल टँकरची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
By सागर दुबे | Published: March 26, 2023 07:17 PM2023-03-26T19:17:12+5:302023-03-26T19:17:18+5:30
नशिराबाद गावाजवळील घटना ; अपघातग्रस्त वाहने घेतली ताब्यात
जळगाव : जळगावकडून भुसावळकडे निघालेल्या चटई कामगारांच्या दुचाकीला सुसाट ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा जागीच मृत्यू झाला. संदिप मानसिंग शिरसाम (२८), वसंत मुन्ना वरखेडे (२८, दोन्ही रा. धामण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) असे दोन्ही मृत कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तर दोन्ही अपघातग्रस्त वाहने सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
संदीप शिरसाम आणि वसंत वरखेडे हे दोन्ही मित्र मुळचे धामण्या येथील रहिवासी होते. दोन्ही जळगावातील वेगवेगळ्या ठिकाणी चटई कंपनीमध्ये कामाला होते. त्यामुळे ते सद्या पंढरपूर नगरमध्ये राहत होते. रविवारी दुपारी दोघेही त्यांच्या ताब्यातील एम.पी.४८.एम.आर.५३९७ क्रमांकाच्या दुचाकीने जळगावकडून भुसावळच्या दिशेने जात होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावातील उड्डाणपूलाजवळून जात असताना त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून जळगावच्या दिशेने जाणा-या सुसाट वेगातील ऑईलच्या टँकरने (एमएच.०४.डीएस.२२१७) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील संदीप आणि वसंत यांना डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव...
महामार्गावर अपघातानंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून अपघाताची नशिराबाद पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिम मोरे, सहाय्यक फौजदार अलियार खान, अतूल महाजन, रूपेश साळवे आणि तुषार पाटील यांच्यासह इतर पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून दोन्ही तरूणांचे मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. तसेच संदीप याच्या कंपनीतील कर्मचारीही रूग्णालयात दुपारी दाखल झाले होते. तर दोन दिवस कंपनीला सुट्टी होती तर रविवारी त्याची नाईट ड्युटी होती, असे त्यांनी सांगितले होते.
चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले
मयत संदीप शिरसाम याच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, तीन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, दोन विवाहित बहीणी, तर वसंत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन वर्षाची मुलगी, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. दोन्ही तरुणाच्या चिमुकल्यांचे कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले आहे. जळगावातील नातेवाईकांच्या माध्यमातून अपघाताची माहिती मयताच्या कुटुंबियांना देण्यात आली असून दोघांचे कुटुंबिय मध्यप्रदेशातील बैतूल येथून दुपारी जळगावकडे येण्यासाठी निघाले होते.