बाळाला वा:यावर सोडून मातेचे पलायन
By admin | Published: June 1, 2016 12:59 AM2016-06-01T00:59:49+5:302016-06-01T00:59:49+5:30
सात दिवसाच्या बालकाला सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील प्रसूती व बालरोग विभागाजवळ घडला.
जळगाव : पाणी पिऊन येते, असे सांगून सात दिवसाच्या बालकाला सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील प्रसूती व बालरोग विभागाजवळ घडला. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. अतिशय गोंडस अशा बाळाला सोडून पळ काढलेल्या या मातेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ही निर्दयी माता रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. पाणी पिऊन येते, बाळाकडे लक्ष ठेवा.. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाजवळील बाहेरील मोकळ्या जागेत मंगळवारी सकाळी साडे सात वाजता एक महिला बालकाला घेऊन येते. तेथे उपस्थित असलेल्या सहा ते सात महिलांच्या शेजारी बसते. बालकाला दूध पाजल्यानंतर पाणी पिऊन येते; बाळाकडे लक्ष ठेवा, असे शेजारच्या महिलेला सांगून पावणे आठ वाजेच्या सुमारास बाहेर गेलेली ही महिला परत आलीच नाही. पोलिसांना चौकशीत असहकार्य बरीच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ही महिला परत न आल्याने एका महिलेने हा प्रकार तेथे असलेल्या मंगला पवार व रियान शेख या महिला सुरक्षा रक्षकांना सांगितला, त्यांनी परिचारिका लता किसन देशमुख व विमल संजय चौधरी यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांना घटनेविषयी कळविण्यात आले. उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहायक फौजदार सुभाष पवार व कॉन्स्टेबल प्रवीण भोसले यांनी घटनास्थळ गाठून परिसरात चौकशी केली. मात्र, सकाळी तेथे उपस्थित असलेली एकही महिला माहिती देण्यासाठी पुढे आली नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले जिल्हा रुग्णालयात इतरत्र प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.के. शेळके यांच्या दालनात रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात सकाळी 7.40 ते 7.48 या 8 मिनिटांच्या वेळेतच महिलेने बाळाला सोडून पलायन केल्याचे स्पष्ट दिसत आहे.