...तेथे कर माझे जुळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:48 AM2020-03-23T11:48:44+5:302020-03-23T11:51:00+5:30
कृतज्ञता : आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांसह पोलिसांना मानाचा मुजरा
जळगाव : एकीकडे कोरोनाबाबत घराघरात काळजी पसरलेली असताना स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहत समाजाचं कोरोनापासून रक्षण करणा-या डॉक्टर, परिचारिका, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस अन् आरोग्य खात्यातील कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजता टाळ्या वाजवून तर काही ठिकाणी थाळीनाद, घंटानाद करण्यात आला.
एकीकडे सारेजण घरात बसलेले असताना दुसरीकडे समाजातील हा ‘कोरोना’ नाहीसा करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य खात्यातील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पोलिसही बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. या साऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सलाम करण्यासाठी रविवारी सायंकाळी घंटानाद, थाळीनाद करण्यात आला. टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता रुग्णवाहिकांनी शहरातून फिरून सायरन वाजवला तर महापालिकेनेही भोंगा वाजवून नागरिकांना याबाबतच्या सुचना दिल्या.
घराच्या, इमारतीच्या गच्चीवर तर काहींनी घराच्या पुढील मोकळ्या जागेत टाळ्या वाजवून वा थाळीनाद करून कृतज्ञता व्यक्त केली. गुजराल पेट्रोलपंप परिसरातील सुकृती सोसायटीसह शहरातील अनेक भागातील नागरिकांनी थाळी वाजवून, घंटनाद करत आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. सुकृती पिनॅकल सोसायटीमधील रहिवाशांनी सायंकाळी ५ वाजता घराबाहेर येवून हातात तिरंगा ध्वज घेत आधी भारत माता की जय चा घोष केला़
नंतर थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकले़ यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर अहिराव, सुनील पाटील, जयदीप पाटील, प्रकाश सपकाळे, श्वेता अहिरराव, जयश्री पाटील, देवता चौधरी, अभिनिता बाहेती, मृणालिनी कुरमभट्टी, वैशाली टाटीया, निर्मला महाजन, दीपा सूर्यवंशी, पूनम शहा, शैलजा साकरे आदींची समावेश होता.
ढोल-ताशांचा गजर तर फोडले फटाके
सायंकाळी शनिपेठ परिसरामध्ये काही तरूण फटाके फोडताना दिसून आले़ तर निवृत्तीनगर परिसर, शनिपेठ तसेच नवीपेठ परिसरात ढोल-ताशांचा गजर होताना बघायला मिळाला.
दरम्यान, अनेकांनी घराबाहेर बाहेर येवून टाळ्या वाजवून संकटाच्या काळात आपलं योगदान देणाºया पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली़ चिमुकल्या बालकांनीही आपल्य आजी-आजोंसोबत घराबाहेर येवून थाळी वाजवून आदर व्यक्त केला़ सुभाष चौक परिसर, पांझरापोळ, शनिपेठ, प्रेमनगर, पिंप्राळा, रथचौक परिसरा यासह शहरातील विविध भागांमध्ये थाळी वाजवून, घंटानाद केला़ पिंप्राळ्यातील केसरीनंदन हनुमान मंदिरात तरूणांकडून घंटानाद करण्यात आला़ नागरिकांनी प्रतिसाद देत थाळी वाजवून कृतज्ञता व्यक्त केली.
सतपंथ मंदिरातर्फे चहा व बिस्किट वाटप
शहरातील सतपंथ मंदिर (निष्कलंकी धाम) तर्फे रविवारी सायंकाळी ‘जनता कर्फ्यू’ पार्श्वभूमीवर शहरात सेवा देणाºया नागरिकांना चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले़ हा उपक्रम मंदिराचे मुखी महाराज सुनील भावसार, राहुल जुनागडे व त्यांच्या पत्नी श्रध्दा जुनागडे यांनी राबविला़ कर्फ्यूमुळे शहरातील सर्व दुकाने बंद असल्यामुळे देश सेवेत सहभागी पोलीस तसेच नागरिकांना चहा व बिस्कीट वाटप केले़
पेट्रोलपंप सुरु; परंतु वाहनेच नाहीत...
अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलपंप सुरु ठेवण्यात आले होते. मात्र वाहनेच नसल्याने कर्मचारी बसून होते. अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलपंप सुरु ठेवण्यात आले होते. मात्र रस्त्यावर वाहनेच नसल्याने एखाद्या तासाने एखादे वाहन पेट्रोल भरण्यासाठी येताना दिसत होते. महामार्गावरही तुरळक वाहनेच वाहतूक करताना दिसत होती.
कर्मचा-यांतर्फे जागृती
शहरातील उपनगरांमध्ये सायंकाळी महापालिकेच्या कर्मचाºयांनी वस्तीवस्तीत जाऊन याबाबत जागृती केली होती. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्येही टाळ्या, थाळीनाद, घंटानाद उत्स्फूर्तपणे करण्यात आला.
मंदिरांमध्येही घंटानाद
काही मंदिरांमध्येही घंटानादचे आयोजन करण्यात आले होते. बळीराम पेठेतील ओम हेरंब गणपती मंदिरात घंटानाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ललित बागरे, जितेंद्र बागरे्न, परशुराम गवळी, राधेशाम देशमुख, अजय इंगळे, रमेश जगताप, अजय घोरपडे उपस्थित होते.
रक्ताचा तुटवडा
कोरोना आजारामुळे समाजात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी रक्तदानावरही परिणाम होऊन अनेक रक्तदान शिबिरे पुढे ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला वेळेवर रक्तपुरवठा होणे अडचणीचे होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन न करता तरुणांनी प्रत्यक्ष रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानचे आरोग्य विभाग समन्वयक भानुदास सेवलेकर यांनी सांगितले.
युवाशक्तीतर्फे भोजन सुविधा
युवाशक्ती फाउंडेशन तर्फे गरिबांना भोजन वाटप करण्यात आले. रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, सिंधी कॉलनी, सिव्हिल हॉस्पिटल, महाबळ, पांडे डेअरी चौक अशा ठिकाणी भोजन वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, मनजीत जागींड, पियुष हसवाल, नवल गोपाळ, उमाकांत जाधव, राहुल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.