शेतातील सहाशे केळीचे घड माथेफिरुने कापून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:26 PM2020-07-04T22:26:27+5:302020-07-04T22:26:33+5:30
पिचर्डे मार्गावर कृत्य । दीड लाखांचे नुकसान
कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या बोदर्डे येथील सरपंच योगेश संतोष पाटील यांच्या पिचर्डे रस्त्यावर असलेल्या शेतातील कटाईवर आलेल्या केळीचे सहाशे घड अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याने पाटील यांचे सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले. या बाबतीत भडगाव पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, बोदर्डे ता.भडगाव येथील सरपंच योगेश संतोष पाटील यांच्या पिचर्डे रोड लगत असलेल्या शेतात साडेसहा हजार केळी खोडाची लागवड करण्यात आली आहे.
कापणीवर असलेल्या या केळीच्या बागेत कोणी अज्ञात व्यक्तीने २ च्या मध्यरात्री दहा ते पंधरा केळीचे घड कापून फेकले या नंतर ३ च्या मध्यरात्री नंतर सहाशे केळीचे घड कापून फेकल्याने योगेश पाटील यांचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीही केले नुकसान
या अगोदरदेखील ५ जुन च्या रात्री योगेश पाटील यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची मोटरसायकल अज्ञात व्यक्ती ने काही अंतरावरील शेतात कोरड्या विहिरीत फेकून दिली होती. यानंतर ते रहात असलेल्या घरा जवळील लाईटदेखील फोडण्यात आली होती सातत्याने गेल्या महिन्याभरा पासून काही अज्ञात व्यक्ती सरपंच पाटील यांचे नुकसान करीत आहे. या बाबतीत योगेश पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे.
असंतुष्ट लोकांकडून नुकसान !
कोरोना संदर्भात गावात कडक बंधन लावल्या मुळेच काही असंतुष्ट व्यक्तींकडुन माझे आर्थिक नुकसान केले जात असल्याचा आरोप योगेश पाटील यांनी केला आहे. सदर अज्ञात व्यक्तीचा तत्काळ शोध घेऊन कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा योग्य वेळी बंदोबस्त न झाल्यास त्याची हिम्मत वाढेल व तो अजून मोठ्या प्रमाणात माझे नुकसान करू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तीन ते चार अज्ञात व्यक्ती कडून सदर प्रकार घडत असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.