‘मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स’द्वारे होणार गणिताशी गट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:08 PM2020-05-06T19:08:12+5:302020-05-06T19:08:27+5:30
जळगाव - गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आढ्या पडतात. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आकडे फिरू लागतात. यामुळे केवळ पास ...
जळगाव- गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आढ्या पडतात. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर आकडे फिरू लागतात. यामुळे केवळ पास होण्याइतपत अभ्यास करावा आणि गणिताचा विषय संपवावा, अशी अनेकांची भावना असते. मात्र, गणिताशी गट्टी व्हावी, आणि सोप्या पध्दतीने गणित सोडविता यावे, या उद्देशाने शहरातील अविनाश किरण जावळे या शिक्षकाने ‘मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांची गणिताची भीती कायमची दूर होऊन त्यांना गणित आवडू लागले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे़
केवळ पास होण्याइतपत गणिताचा अभ्यास करावा आणि विषय संपवावा, अशा अनेकांच्या भावना असते़ मात्र, गणिताला रंजक पद्धतीने जर मांडले तर तो सोपा होऊ शकतो. या हेतूने पाळधी येथील आर्यन इंटरनॅशनल स्कूलचे उपमुख्याध्यापक असलेले अविनाश जावळे यांनी लॉकडाऊन काळात मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स हे पुस्तक लिहिले आहे.जावळे हे नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून त्या माध्यमातून ते गत दोन वर्षांपासून गरीब, गरजू मुलांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग चालवत आहे. या वर्गाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता आधुनिक शिक्षणाचे धडे देत आहेत. या पुस्तकात जावळे यांनी गणित विषयामधील अवघड वाटणारे गणितीय उदाहरण सोडवण्यासाठी सोप्या पद्धतीची मांडणी केली आहे.
गरजू मुलांच्या नावे पुस्तकात ट्रिक्स
दरम्यान, वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवताना एका विद्यार्थ्याने पुस्तकामधील लेखकाप्रमाणे आमचेही नाव पुस्तकात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार जावळे यांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिण्याचे ठरवले. मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स पद्धतीत प्रामुख्याने दोन अंकी नंबरपासून ते सहा अंकी नंबरपर्यंतचे गुणाकार दोन मिनिटात सोडवणे, दोन अंकी नंबरचे वर्ग सोप्या पद्धतीने काढणे, १-१०० पर्यंतचे पाढे सोप्या पद्धतीने लिहिणे व पाठ करणे आदींचा अवलंब केला आहे. या पुस्तकासाठी त्यांना वडील किरण जावळे, प्रभुदास जावळे, प्रल्हाद जावळे, प्रमोद जावळे, गीता जावळे, सतीश जावळे, धीरज जावळे यांचे सहकार्य लाभले आहे.