मुक्ताईनगर तालुक्यात आढळलेले अर्भक अनैतिक संबंधातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:07 PM2017-07-27T12:07:53+5:302017-07-27T12:10:12+5:30
तपासात उघड : अर्भकासह माता व ‘त्या’ पित्याचे घेतले डीएनए
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात आढळलेले पुरुष जातीचे अर्भक हे अनैतिक संबंधातून जन्माला आलेले असून त्याचे बिंग फुटू नये म्हणून जन्मदातीनेच ते फेकून दिल्याची धक्कादायक घटना चौकशीत उघड झाली आहे. पोलिसांनी हे अर्भक जिल्हा रुग्णालयात ठेवले असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान, अर्भक, जन्मदाती व तिचा प्रियकर अशा तिघांचे डीएनए नमुने बुधवारी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आले असून ते तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यात एका गावात 14 जुलै रोजी एक दिवसाचे जिवंत अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले होते. तेथील पोलीस पाटील यांनी याबाबत मुक्ताईनगर पोलिसांना माहिती दिल्यावरुन त्या अर्भकाला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जन्मदातीविरुध्द कलम 317 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी तथा महिला उपनिरीक्षक वंदना सोनुने यांनी गावात तसेच परिसरात चौकशी केली असता सात दिवसानंतर जन्मदाती तरुणीबाबत त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार तिची चौकशी केली असता प्रारंभी ‘ती मी नव्हेच’ अशी भूमिका तरुणीने घेतली. कायदा व पुरावे याची जाणीव करून दिल्यानंतर तरुणीने फेकलेले अर्भक माङोच असल्याची कबुली दिली. गावातीलच एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याने त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली व 14 जुलै रोजी जन्म दिल्यानंतर त्या अर्भकाला फेकून दिले. अनैतिक संबंधाची बोंब फुटेल म्हणून हा निर्णय घेतल्याचे तिने तपासात सांगितले.