चांगल्या साहित्यासाठी मुलांच्या भावविश्वाशी एकरूप व्हावे : माया धुप्पड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 04:03 PM2017-12-13T16:03:24+5:302017-12-13T16:22:18+5:30
बालकवी पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१३ : प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान मूल दडलले असते. ते जेव्हा प्रकट होते, त्या वेळी निर्माण झालेले बालसाहित्य हे खरोखर लहान मुलांना आवडणारे असे असते. लहान मुलांच्या भावविश्वाशी एकरूप झाल्या शिवाय चांगले चांगले बालसाहित्य तयार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन येथील कवयित्री माया दिलीप धुप्पड यांंनी केले.
माया धुप्पड यांंना सोमवारी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार जाहीर झाला. या अनुषंगाने ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूपच आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.
मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाºया यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ अंतर्गत धुप्पड यांच्या ‘सावल्यांचं गाव’ या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.
धुप्पड यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बालकाव्याबद्दल मिळालेल्या या पुरस्काराचा विशेष आनंद असून या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी ऋण व्यक्त केले. याच पुस्तकाला चार राज्यस्तरीय पुरस्कारही याआधी मिळाले आहेत.