अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे; शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
By विलास बारी | Published: December 31, 2023 08:16 PM2023-12-31T20:16:04+5:302023-12-31T20:50:35+5:30
लष्करात कर्तव्य बजावताना निधन : पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जळगाव : ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषणांनी रविवारी सकाळी कुसुंबे, (ता. जि. जळगाव) येथे वीर जवान भानुदास कौतिक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वीर जवान भानुदास पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
भारतीय सैन्य दलातील भुज येथील १२४९ डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॅम्प) प्लाटून ७५ इन्फेंन्ट्री ब्रिगेड येथे ते सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास कौतीक पाटील (वय ५५) यांचा शनिवारी (दि.३०) आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, शहीद जवानाची वार्ता कुसुंबा येथे धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी कुसुंबा (ता. जि. जळगाव) येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
वीर जवान भानुदास पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अर्पित चव्हाण, तहसीलदार विजय बनसोडे, पो. नि. जयपाल हिरे, डिफेन्स सिक्युरिटी कॅम्पचे सुभेदार अवतार सिंह, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे हवालदार रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे व सुगंधा पाटील, सरपंच यमुना ठाकरे, पोलिस पाटील राधेश्याम चौधरी यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. वीर जवान पाटील यांचा मुलगा सचिन याने मुखाग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे.