आंबेडकर उद्यानातील अतिक्रमित हॉटेल हटविण्याचे महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:58+5:302021-01-21T04:15:58+5:30

सात दिवसांत काढा, अन्यथा जेसीबीद्वारे पाडू : महापौरांचा इशारा ; गटारीच्या कामावरून अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

Mayor orders removal of encroached hotel in Ambedkar Park | आंबेडकर उद्यानातील अतिक्रमित हॉटेल हटविण्याचे महापौरांचे आदेश

आंबेडकर उद्यानातील अतिक्रमित हॉटेल हटविण्याचे महापौरांचे आदेश

Next

सात दिवसांत काढा, अन्यथा जेसीबीद्वारे पाडू : महापौरांचा इशारा ; गटारीच्या कामावरून अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -शहराच्या स्वच्छतेसाठी महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले असून बुधवारी प्रभाग ७, ८, ९ मध्ये दौरा करण्यात आला. पाहणी दौऱ्याच्या सुरुवातीलाच ख्वाजामियाँ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मनपाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या अतिक्रमित हॉटेलमध्ये महापौरांनी धडक दिली. हॉटेलमालकाला जाब विचारत महापौरांनी तात्काळ हॉटेल हटविण्याचे अतिक्रमण विभागाला आदेश केले. हॉटेल चालकाने सात दिवसांची मुदत मागितली असून, सात दिवसांत जर साहित्य काढले नाही तर जेसीबीद्वारे सर्व हॉटेल मालासकट पाडू, असा इशारा महापौरांनी दिला आहे.

यावेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रा. सचिन पाटील, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, चंद्रशेखर पाटील, मयूर कापसे, राम पाटील, मनोज काळे, भरत सपकाळे, गजानन देशमुख, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

सूचना, झाडाझडती अन‌् नोटीस

१. या दौऱ्यात महापौर अधिकच आक्रमक दिसल्या. विविध समस्यांबाबत माहिती घेवून सूचना दिल्या, तर कामचुकार अधिकाऱ्यांची चांगल्याच शब्दात कानउघाडणी केली. भगीरथ कॉलनीत पाहणीदरम्यान काही खासगी भूखंडावर घाण आढळून आली. महापौरांनी सूचना देत अशा भूखंडावर घाण असल्यास संबंधित जागा मालकाला नोटीस देण्याच्या सूचना दिल्या.

२. शिवकॉलनीतील नाल्याची साफसफाई झाली असून घाण साचल्याने डासांचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौरांनी लागलीच नालेसफाईकामी जेसीबी उपलब्ध करून घ्यावे, असे सांगितले.

३. बजरंग बोगदा ते शिवकॉलनी रेल्वेपूल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा हॉकर्सची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहनधारकांना त्रास सहन होत असल्याची तक्रार करताच महापौरांनी अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस, दंड

बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३८१ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३४३ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ५५ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या ५७ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. बुधवारी शहरातून २९४ टन कचरा संकलित करण्यात आला.

Web Title: Mayor orders removal of encroached hotel in Ambedkar Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.