महापौर आमचाच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:06+5:302021-03-18T04:16:06+5:30
महापालिकेतील बलाबल भाजप - ५७ शिवसेना - १५ एमआयएम - ३ फुटीनंतरचे चित्र भाजप - ३० शिवसेना - १५ ...
महापालिकेतील बलाबल
भाजप - ५७
शिवसेना - १५
एमआयएम - ३
फुटीनंतरचे चित्र
भाजप - ३०
शिवसेना - १५
फुटलेले नगरसेवक - २७
एमआयएम - ३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा महापौर व उपमहापौरपदांसाठी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडल्याने भाजपला महापौरपदासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. तर, शिवसेनेलादेखील अपेक्षित बहुमतासाठी काही नगरसेवकांचा जुगाड करावा लागणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या वतीने महापौर आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ऐतिहासिक बहुमत मिळवले असतानाही, गुरुवारी होणाऱ्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बहुमतासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. भाजपचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. यामुळे शिवसेनेकडे ४५ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. तर, भाजपकडूनदेखील बहुमत प्राप्त केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गुरुवारी महापौर कोणाचा, याबाबतचा फैसला होणार असून, यासाठी दोन्ही पक्षांकडून कोणतीही कमतरता ठेवली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोट..
कुणी कितीही घोडेबाजार करू देत, गुरुवारी महापौर व उपमहापौर आमचेच असतील. ज्या नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. ते पक्षाच्या ताकदीवर निवडून आले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. आमदारांच्या डोक्यावर खापर फोडून त्यांनी बंडखोरी केली आहे. पण, गेली अडीच वर्षे आमदारांनी प्रत्येक निर्णय त्यांना विश्वासात घेऊनच घेतला आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे योग्य नाही. आज आमच्याकडून दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. आता आमचे वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेऊन त्यातील दोन नावे अंतिम करतील.
- भगत बालानी, गटनेते, भाजप
शिवसेनेचे स्थानिक नेते तथा माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, गेल्या अडीच वर्षांच्या काळात भाजपचे बहुमत असताना शहरात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नाहीत. याबाबत खुद्द भाजपचे काही नगरसेवक नाराज होते. शहराच्या विकासासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधून एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांना आम्ही साथ दिली. आता गुरुवारी आम्ही आमचे अपेक्षित संख्याबळ दाखवून देऊ. ते संख्याबळ निश्चितच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणारे असेल.
- नितीन लढ्ढा, नगरसेवक, शिवसेना