अमृतच्या पंप हाऊसची महापौरांकडन पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:33+5:302021-01-03T04:17:33+5:30
जळगाव : सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, या ठिकाणी अमृत योजनेंतर्गत नवीन जलकुंभ ...
जळगाव : सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, या ठिकाणी अमृत योजनेंतर्गत नवीन जलकुंभ आणि पाण्याची टाकी तयार करण्यात येत आहे. शनिवारी महापौर भारती सोनवणे यांनी या पंप हाऊसची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी अखेर नागरिकांना पाणी पुरवठा मिळणार असल्याचे महापौरांना सांगितले.
यावेळी उपमहापौर सुनील खडके, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रियाज बागवान, निता सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, सुरेश भापसे, दिलीप सोनवणे, संजय विसपुते, वाहिद खान, आदिल शाह यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौरांनी सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पंप हाऊसचा स्लॅब उघडण्यास ८ दिवसांचा कालावधी लागणार असून, टाकीला प्लॅस्टर करण्यास महिनाभर वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंप हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी विद्युत मोटार बसविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागणार असल्याची माहितीही मक्तेदाराने दिली. यावेळी महापौरांनी नागरिकांना नवीन नळ संयोजन घेण्याबाबत ध्वनीफीत तयार करून घंटागाडी आणि रिक्षाच्या माध्यमातुन जनजागृती करण्याचे आवाहनही महापौरांनी सबंधित अधिकाऱ्यांना केले.
नवीन कनेक्शन घेण्याचे आवाहन :
सुप्रीम कॉलनी परिसरात अनेक घरांना पिण्याच्या पाण्याचे संयोजन नसून, काही ठिकाणी अवैध नळ संयोजन आहेत. नवीन टाकीवरून अमृत योजनेची जोडणी करण्यात आली असून त्याद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. तरी नागरिकांनी नवीन नळ संयोजन लवकरात लवकर घेण्याचे आवाहनही महापौरांनी केले आहे.