पहिल्या मुलीनंतर पाळणा थांबवा, ५० हजार रुपये मिळवा!; जाणून घ्या सरकारी योजनेचा निकष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:30 PM2022-06-09T17:30:19+5:302022-06-09T17:31:14+5:30

एका मुलीच्या जन्मानंतर माता किंवा पित्याने दोन वर्षांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Mazi Kanya Bhagyashree Scheme for population control | पहिल्या मुलीनंतर पाळणा थांबवा, ५० हजार रुपये मिळवा!; जाणून घ्या सरकारी योजनेचा निकष

पहिल्या मुलीनंतर पाळणा थांबवा, ५० हजार रुपये मिळवा!; जाणून घ्या सरकारी योजनेचा निकष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली असून, पहिल्या मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्यास ५० हजार रुपये, तर दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी २५-२५ हजार रुपये शासनाकडून ठेवींच्या रूपात उपलब्ध होतात.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना होय. २०१७ पासून ही योजना अस्तित्वात आली आहे. या योजनेच्या निकषात जानेवारी २०२२ मध्ये सुधारणा करण्यात आली. एका मुलीच्या जन्मानंतर माता किंवा पित्याने दोन वर्षांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

दोन मुलीनंतर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केलेल्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळेल. मात्र विधवा महिलेने पती निधनाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केल्यास तिच्याकडून कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची मागणी करता येत नाही. योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे, तसेच तिने १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे. इयत्ता १० वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण असली, तरी तिला योजनेचा लाभ मिळतो. वयाच्या टप्प्यानुसार वेळोवेळी तिला व्याज मिळते.

बालगृहातील अनाथ मुली, अनाथ परंतु नातेवाइकाबरोबर राहणाऱ्या एक किंवा दोन मुली, जुळ्या अपत्यांपैकी ट्रान्सजेंडर अपत्याबरोबर जन्मणारी मुलगी यांच्यासाठीही योजनेत तरतूद आहे. प्रथम अथवा द्वितीय अपत्यांपैकी एक ट्रान्सजेंडर अपत्य व दुसरे अपत्य मुलगी असल्यास त्या मुलीलाही योजनेतून लाभ मिळतो.

वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत हवे

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू आहे. लाभार्थी मुलीचे आई किंवा वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

पहिल्या मुलीनंतर शस्त्रक्रियेला ५० हजार

एका मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रिया करून घेतल्यास शासनाकडून मुलीच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ५० हजार रुपये गुंतविण्यात येतात.

दुसऱ्या मुलीनंतर शस्त्रक्रियेला २५ हजार

दोन मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये (एकूण ५० हजार रुपये) दोनही मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात.

जिल्ह्यात ५० लाभार्थी

जळगाव जिल्ह्यात योजनेचा लाभ मार्च २०२० अखेर ७५ जणांना मिळाला आहे. योजना सुरू झाल्यापासूनचे हे लाभार्थी आहेत. यानंतर दाखल प्रस्तावांची छाननी केली जात आहे, अशी माहिती मिळाली.

Web Title: Mazi Kanya Bhagyashree Scheme for population control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.