अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणारे शा.न.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:12 PM2019-07-15T17:12:43+5:302019-07-15T17:13:12+5:30

जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील मराठीचे सेवानिवृत्त प्राध्यापक शा.न.पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणाऱ्या प्रा.शा.न. पाटील यांच्याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लिहिताहेत याच महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक शेखर सोनाळकर...

Meaningful working life, SHAN PATIL SHARING SARA GURU | अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणारे शा.न.पाटील

अर्थपूर्ण कृतीशील जीवन, साने गुरुजींचा वारसा जपणारे शा.न.पाटील

Next

ते ८० वर्षांचे होते. मरणानंतर त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान झाले. देहदान केले. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होईल. त्यांच्या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देह मिळेल. त्यांना अवयव दान करायचे होते. अवयव दान केले असते तर गरजुला हृदय, किडनी, लिव्हर मिळाले असते. पण जळगावमध्ये अशी सोय नाही. यामुळे त्यांना अवयव दान करता आले नाही.
प्रा.शा.न. पाटील यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर दहावे-बारावे घातले गेले नाही. त्यांचे कुटुंबीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना जेवण देणार आहेत. कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत. वायफळ खर्च करू दिला नाही. ते सच्चे सेक्युलर इहवादी होते. आपल्या मृत्यूनंतर आपला देह समाजाच्या उपयोगी यावा, आपला कणकण समाजाच्या सेवेत द्यावा, हा विचार किती वेगळा, किती समृद्ध आहे.
हा माणूस असा वेगळा कसा निर्माण झाला. गरिबी पाहून संघर्ष करून पुढे येताना त्यांनी असा कृतीशील मरणाचा विचार कसा केला. ते खूप वाचणारे, विचार करणारे होते. त्यांच्यावर गांधीजी, साने गुरुजी यांचे संस्कार होते. ते नेहमी सर्व समाजाचा विचार करीत. त्यांना गांधीजींचा ग्रामसफाई, श्रमाचा संस्कार, ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार, शेवटच्या माणसाचा विचार व सर्वधर्मसमभाव भावात असे. तर साने गुरुजींचा प्रेममय जगाचा, समतेचा, करुणेचा विचार व साने गुरुजींचे संस्कारक्षम साहित्य, गीते यांचा विचार भावत असे.
त्यांचा माझा संपर्क हा मू.जे.महाविद्यालयात आला. मू.जे. महाविद्यालयाची शिक्षकांची खोली स्टाफरूम म्हणजे एक शैक्षणिक-सामाजिक विचार आदान प्रदान करण्याचे विचारपीठ होते. तेथे वेगळा सर्वसमावेशक व गांधी तत्वज्ञानातील निर्वेर तरीही परखड सेक्युलर विचार ते मांडत असत व तो वेगळेपणामुळे व संवेदनशीलता असण्याने भावत असे. तो विचार त्यांच्या मांडणीत येत असे. मराठीच्या तासिकेला दांडी मारण्याची विद्यार्थ्यांची पद्धत आहे. पण यांच्या वर्गात गर्दी असे.
एका गरीब घरात पाच बहिणी, एक भाऊ अशा परिवारात त्यांचा जन्म झाला. ते चहार्डी (ता.चोपडा) येथे सातवीपर्यंत शिकले. चरितार्थासाठी शिवणकाम करीत. वाचनाची आवड होती. एक जाहिरात वाचली व ज्युनिअर पीटीसीच्या शिक्षणासाठी त्यांनी अर्ज केला. सातवीतील उत्तम गुणांमुळे प्रवेश मिळाला व ते प्राथमिक शिक्षक झाले. त्यांना नोकरी लागली आणि एका वर्षात वडील वारले. घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. ते पैसा वाचविण्यासाठी एकदा जेवत. पत्नी पाचवी शिकली होती. तिला शिकवून त्यांनी प्राथमिक शिक्षिका केले. त्यावेळी त्यांची आई पैसे मिळविण्यासाठी शेतावर कामाला जात असे. सासू शेतात मजुरी करते व सून शिकते याबद्दल समाजातून टीका झाली. पण त्यांनी निर्धाराने पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. दोन्ही लहान बहिणींना शिकविले व प्राथमिक शिक्षिका केले. नंतर त्यांचा विवाह लावला. त्यांनी भाच्या, पुतण्या यांना शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास प्रवृत्त केले. घरदार शिकविले. स्वत बी.ए., एम.ए.केले. नोकरी सांभाळून शिकत असताना त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे त्यांची मू.जे. कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापकपदी निवड झाली. त्यांनी बी.ए.ला व एम.ए.ला प्रथम क्रमांक मिळवणाºया विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.
त्यांनी सहकाऱ्यांसोबत त्यांनी अभ्युदय सहकारी पतपेढीची स्थापना केली. ते संस्थापक अध्यक्ष झाले. पुढे त्यांनी स्वत:ची अभिनव सहकारी पतपेढीची स्थापना केली. ते संस्थापक अध्यक्ष झालेत. पुढे त्यांनी स्वत:ची अभिनव सहकारी पतपेढीची स्थापना केली. समाजाने पतपेढ्या बुडवणारे, स्वत: कर्ज घेणारे पतपेढ्यांचे अध्यक्ष पहिले आहेत. त्यांच्या विरोधात ठेवीदारांचे पैसे बुडविले. यासाठी मोर्चेदेखील निघतात. शा.न.पाटील ओळखीच्या गरिबांकडे जात तुझे घर पत्र्याचे आहे, भिंती बांध, कौले टाक, स्लॅब टाक, मी तुला सोसायटीतून कर्ज देतो असे सांगून कर्ज देत. ज्या गरीबाला कोणी उभे करीत नसे अशांना त्यांनी कर्ज दिले. कर्जदारांचे व्याज थकले व तो गयावया करू लागला की ते सांगत मी निम्मे व्याज भरतो. तू निम्मे व्याज भर. पुढे हे सर्व कर्जदारांना समजले व शा.न.पाटील सरांचा सगळा पगार व्याज-हप्ते भरण्यात खर्च होऊ लागला. सरांना चिंता नव्हती. वहिनींच्या पगारात भागत होते. शेवटी इतर संचालकांनी ठराव केला की कोणाही कर्जदाराने शा.न.पाटील सरांकडे जाऊ नये.
शा.न.पाटील सर निवृत्त झाले आणि त्यांच्या सामाजिक कामाला वेग आला. त्यांनी के.बी.पाटील, शरद छापेकर अशा सत्प्रवृत्त व्यक्तींसोबत ट्रस्ट स्थापन करून सामाजिक काम करणाºया आदर्श व्यक्तींना पुरस्कार देणे सुरू केले. त्यात त्यांनी मेधाताई पाटकर, डॉ.अण्णासाहेब तोंडगावकर, नीलिमा मिश्रा, आदिवासींच्यात काम करणारे चेत्राम पाटील, डॉ.संग्राम व डॉ.नुपूर पाटील, मुस्लीम सत्यशोधक समाजाचे शमशुद्दीन तांबोळी, आदिवासींच्यात काम करणारे वाहरू सोनवणे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अविनाश पाटील, लताताई पाटणकर, वासंती दिघे, जळगाव पीपल्स बँक उत्तमरित्या सांभाळणारे भालचंद्र पाटील, डॉ.श्री व सौ.आरती हुझुरबाजार, यजुर्वंेद्र महाजन यांचा सन्मान केला. शा.न. पाटील सरांच्या कार्याचा खास सत्कार भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता.
शा.न.पाटील सरांनी आपला सुमारे २५ लाखांचा प्लॉट व त्यावर १६.५ लाखांचे बांधकाम करून इंडियन रेडक्रॉस सोसायटीला गरीबांच्या दवाखान्यासाठी देणगी दिला. माजी जिल्हाधिकारी निंबाळकर त्यांनी त्यांचा विशेष आदर सत्कार केला. तपासणी करून वैद्यकीय सेवा मिळते. सिव्हील रुग्णालयात रुग्ण तपासणी फी २० रुपये असताना केवळ दहा रुपयात तपासणी करण्यासाठी तेथे निवृत्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.मावळे, निवृत्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी खडसे व सिव्हील हॉस्पिटलच्या निवृत्त डॉ.बडगुजर व एनएम इंदिराताई असे तज्ज्ञ व अनुभवी सेवाभावी कार्यकर्ते रुग्ण सेवा देत आहेत.
आता मला काय हवे आहे घर झाले. पत्नीला पेन्शन आहे. मला ख्यप मिळते. आधीची सेवा प्राथमिक शिक्षकाची होती. यामुळे त्यांना निवृत्तीनंतरचे पेन्शन इतर प्राध्यापकांपेक्षा कमी मिळाले. तरीही आपल्याला मिळणारे पेन्शन पुरेसे असून ते खर्च होत नाही. यामुळे मला समाजाला देण्यासाठी खूप काही आहे, असे मानून ते काम करीत. त्यांना मुलबाळ नसले तरी त्यांनी सारे नातेवाईक, मित्र जोडून ठेवले. त्यांनी मूल दत्तक घेतले नाही. कुटुंबाचा आग्रह असतानाही दुसरा विवाह केला नाही. पत्नीला आपल्या विचारांचे केले. त्यांच्या पत्नी जीजाताई यांनीही देहदानाचा फॉर्म भरला आहे.
आपण काम करू शकत नाही तर दुसºया काम करणाºयांच्या मागे ते उभे राहत. आपल्याला जे मिळाले ते समाजाकडून मिळाले ते समाजाला परत केले पाहिजे, असा विचार करणारे ते अध्यात्मिक व्यक्ती होते. एका कृतार्थ आनंदी, करुणामय आशयसंपन्न जीवनाचा अंत झाला. अशी माणसे येतात. समाजाला भरभरुन देतात व गावाला संस्कृती आणि ओळख देऊन जातात. त्यांना अखेरचा सलाम.
-प्रा.शेखर सोनाळकर, जळगाव

Web Title: Meaningful working life, SHAN PATIL SHARING SARA GURU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.