वैजनाथ वाळू गटाचे इन कॅमेरा मोजमाप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:16 AM2021-05-22T04:16:05+5:302021-05-22T04:16:05+5:30
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वैजनाथ वाळू गटातून बेसुमार वाळूचा उपसा सुरू असून याठिकाणी मोठमोठे खड्डे पडत आहे. या सर्व ...
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वैजनाथ वाळू गटातून बेसुमार वाळूचा उपसा सुरू असून याठिकाणी मोठमोठे खड्डे पडत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा मोजमाप करण्यात यावे, अशी मागणी ॲड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैजनाथ वाळू गट श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.तर्फे आदित्य खटोड यांनी निविदा भरून घेतलेला आहे. सदर निविदाधारकाकडून पोकलँडच्या सहाय्याने बेसुमार उपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्रात २० ते २५ फुटाचे मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याच्या दिवसात पाणी भरल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या परिसरातील नागरिक या ठिकाणावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. निविदाधारकाकडून नियमबाह्य काम सुरू असून वाळू गटातून दररोज १०० ते १५० डंपरद्वारे वाळूची उचल केली जात आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाला असून १० ते १५ हजार ब्रास वाळू उपसा ठेकेदाराने केलेला आहे. या ठिकाणी केवळ एक हजार ४२८ ब्रासला मंजुरी असताना एवढा वाळू उपसा केला जात असून या ठेकेदारांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न देखील ॲड. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आव्हाने, नारणे, बांभोरी वाळू गटातील उचल संपून संबंधित ठेके शासन जमा झाले आहे. मात्र वैजनाथ वाळू गटात अजूनही उचल सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांची समिती नेमून इन कॅमेरा वाळू ठेक्याचे मोजमाप करावे तसेच कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविल्याने दंडात्मक कारवाई करावी व शासनाची दिशाभूल केली म्हणून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. विजय पाटील यांनी केली आहे.
याविषयी आदित्य खटोड यांनी सांगितले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण घरीच असून या प्रकाराविषयी माहिती घेतो.