आजी-बाबा, कोणत्या चक्कीचं पीठ खातायं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सरकारकडून घरोघरी होतोय संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:55 PM2024-02-15T16:55:12+5:302024-02-15T16:56:11+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशानाच्यावतीने १ लाख २ हजार ६२० मतदारांच्या घरी संपर्क करायला सुरुवात केली आहे.
कुंदन पाटील,जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील वयोगटातील वृद्ध आणि दिव्यांग घरी बसून मतदान करू शकणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने १ लाख २ हजार ६२० मतदारांच्या घरी संपर्क करायला सुरुवात केली आहे. मतदान घरीच करणार की केंद्रावर, असा प्रश्न करुन त्याची प्रत्येक गावात नोंद घेतली जात आहे. तशातच जिल्ह्यात ८६२ जणांनी वयाची शंभरी पार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारांकडून माहिती नोंदविताना निवडणुक प्रतिनिधींनाही सुखद धक्का बसत असल्याचा अनुभव काहीजणांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ८० वर्षांवरील वयोगटातील वृद्ध आणि दिव्यांग घरी बसून मतदान करू शकतील , यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने लाखावर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. वयाची ८० पार मतदारांमध्ये सर्वाधिक जळगाव शहर व जामनेरमध्ये आहेत. तर वयाची शंभरी पार करणाऱ्या २६५ मतदारांची संख्या जळगाव शहरात आहे. ही आकडेवारी जिल्ह्यात सर्वाधिक आहे.वृद्ध आणि दिव्यांग मतदान केंद्रांवर करणार की घरी, याविषयी माहिती नोंदविली जात आहे. त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणुक शाखेला प्राप्त होत आहे.
कुठल्या चक्कीचं पीठ खातायं बाबा?
चाळीसगाव तालुक्यातील एका खेड्यात एक मतदान केंद्र प्रतिनिधी एका वयाची शंभरीपार केलेल्या वृद्धाकडे गेला. वयाची शंभरीपार केल्यानंतरही घराचा दरवाजा स्वत: उघडायला आलेल्या मतदाराचा उत्साह पाहून संबंधित प्रतिनिधीला धक्काच बसला. बाबा, वय किती असे विचारल्यावर १०४ असल्याचे सांगितले. तेव्हा संबंधित प्रतिनिधीला सुखद धक्काच बसला. तेव्हा त्यानेही गंमती प्रश्न केला. बाबा, कुठल्या चक्कीचं पीठ खातायं म्हणून.
१२० वयाचा एक मतदार :
दरम्यान, जळगाव शहरातील एका मतदाराचे वय १२० असल्याचे दिसून येत आहे. मयत झाल्यानंतरही नोंद केली नसल्याने र्षानुवर्षांपासून या मतदाराचे वय वाढ असल्याचे कागदावर दिसून येत असावे, अशी शंका प्रशासनाला आहे.
‘ईव्हीएम’ची पाहणी :
गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह सहकाऱ्यांकरवी ‘ईव्हीएम’ मशीन असलेल्या गोडाऊनला भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान यंत्रणांची पाहणीही केली.
मतदारसंघनिहाय वयाची ८० व शंभरीपार मतदार :
मतदारसंघ-८० पार-१०० पार
चोपडा-९५९३-७१
रावेर-७१३८-३२
भुसावळ-७६१६-११
जळगाव शहर-१२१६७-२६५
जळगाव ग्रामीण-९८३७-९५
अमळनेर-९३६६-७२
एरंडोल-७५७७-७०
चाळीसगाव-९३९२-४३
पाचोरा-९५१२-३६
जामनेर-१०११८-६५
मुक्ताईनगर-९४४२-१०२
एकूण-१०१७५८-८६२
ज्येष्ठ, दिव्यांग, दुर्धर आजाराने बाधीत मतदारांशी घरोघरी संपर्क केला जात आहे. त्यांना मतदानाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन त्यादृष्टीने तयारीदेखिल करीत आहे. -अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणुक)