अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र
By सुनील पाटील | Updated: April 22, 2023 13:08 IST2023-04-22T13:07:58+5:302023-04-22T13:08:27+5:30
यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र
जळगाव : अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करताना यात्रेकरुंना आता जिल्हास्तराव येण्याची गरज नाही. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमरनाथ यात्रेदरम्यान अतिउंचावरील हवामानाच्या त्रासाने उद्भवणाऱ्या वैद्यकीय कारणांमुळे यात्रेकरूंचे जाणारे बळी थांबवण्यासाठी प्रत्येकाची वैद्यकिय तपासणी करुन शारीरीकदृष्ट्या सक्षम आहेत किंवा नाही यासाठी वैद्यकिय प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. आतापर्यंत यात्रेकरूंना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी करून ते प्रमाणपत्र देण्याची मुभा होती. परंतु काही यात्रेकरूंच्या बाबतीत खोटे प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे आता केवळ शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाणार आहे. हे प्रमाणपत्र जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये देण्याची व्यवस्था आहे.
अमरनाथ यात्रेकरुंचा त्रास कमी व्हावा, गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात तपासणीची सोय करण्यात आलेली आहे. यात्रेकरूची मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, दमा, रक्तस्त्रावासंबंधीचे आजार, मेंदूचे आजार, रक्तदाबाच्या तक्रारी अशा आजारांसाठी तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतरच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.