जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयास ‘एमसीआय’कडून हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:16 PM2018-05-03T13:16:09+5:302018-05-03T13:16:09+5:30
मान्यता
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३ - जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) मान्यता दिली असून येत्या आॅगस्ट महिन्यापासून अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी दिली. शासकीय एकात्मिक वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारणीतील सर्वात मोठा टप्पा पार झाल्याचे मानले जात आहे.
जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याविषयी एमसीआयकडे प्रस्ताव होता. त्यानुसार एमसीआयच्या समितीने नोव्हेंबर महिन्यात व ३ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात पाहणी करुन काही त्रुटी दूर करण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांच्या नेतृत्वाखाली त्रुटींची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर २६ एप्रिल रोजी एमसीआयची बैठक होऊन एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देऊन केंद्र सरकारकडे ना हारकत दिली. त्यामुळे आॅगस्ट २०१८ पासून जळगाव येथे १०० जागांसाठी अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार आहे.
या मेडीकल हबसाठी राज्य सरकारने १ हजार २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास या पूर्वीच मान्यता दिली आहे. जळगाव-औरंगाबाद मार्गावर जळगावपासून ५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि दंत्त महाविद्यालय उभारण्यात येईल. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तूर्त हे महाविद्यालय जिल्हा रुग्णालय परिसरात सुरु होईल. तसेच १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय या मेडिकल हबमध्ये असेल.
शासनाने प्रस्तावित केल्या नंतर एका वर्षाच्या आत मान्यता मिळविणारे जळगाव वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व त्रुटी दूर झाल्या असून एमसीआयच्या समितीने पाहणी केल्यानंतर आता मान्यता दिली. त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होईल.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.