जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच खरेदी करणार साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:09 PM2018-10-25T13:09:36+5:302018-10-25T13:10:06+5:30

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाच्या कामाला वेग

Medical education department will procure material for Jalgaon Government Medical College | जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच खरेदी करणार साहित्य

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच खरेदी करणार साहित्य

Next
ठळक मुद्देतयारीला वेगराज्यात जळगावला विशेष बाब

जळगाव : नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या तयारीला वेग आला असून त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी कोणत्याही कंपनीमार्फत न करता वैद्यकीय शिक्षण विभागच स्वत: साहित्य खरेदी करणार आहे.
जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून झाली आहे. त्यात आॅगस्ट २०१८पासून वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात झाली. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने तत्काळ द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव मागविला व त्यानुसार येथे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयारीदेखील सुरू झाली. त्या कामास आता वेग आला असून त्यासाठी जिल्हा रुग्णालयात आवश्यक ते बदल व सुधारणा केल्या जात आहे. सोबतच पदे भरतीबाबतही प्रक्रिया सुरू आहे.
कंपनीमार्फत खरेदी नाही
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षास मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक साहित्य खरेदी एका कंपनीमार्फत करण्यात आली होती. मात्र आता प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रमही सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे कामे लवकर मार्गी लागावे म्हणून यंदा साहित्य खरेदीचे काम कंपनीला न देता वैद्यकीय शिक्षण विभागच साहित्य खरेदी करणार आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक स्तरावरून ही साहित्य खरेदी केली जाणार असल्याची माहिती मिळाली.
राज्यात जळगावला विशेष बाब
वैद्यकीय शिक्षण विभाग राज्यात सर्वत्र नवीन साहित्य खरेदी कंपनीमार्फत करीत असते. मात्र जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास विशेष बाब म्हणून द्वितीय वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना स्वत: साहित्य खरेदीस परवानगी देण्यात आली आहे.
पाचही विभागांची तयारी
द्वितीय वर्षासाठीच्या शरीर विकृती शास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषध शास्त्र, जनऔषध शास्त्र व न्यायवैद्यक शास्त्र या पाच विभागांमध्ये उपकरणांची मांडणी बाबत तयारी केली जात आहे.
प्रथम वर्षासाठी ज्या प्रमाणे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) पथकाने येथे भेट देऊन पूर्ततेची पाहणी करूनच मान्यता दिली त्यानुसार द्वितीय वर्षाच्या तयारीचाही आढावा घेण्यासाठी हे पथक येणार आहे. हे पथक अचानक भेट (सरप्राईज व्हिजिट) देणार असल्याने ते कधी येईल त्या बाबत गुप्तता पाळली जाते. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी गेल्या महिन्यातभेट देऊन पाहणी केली होती. त्या वेळी त्यांनी आवश्यक कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या कामाला वेग आला असून साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. संचालक स्तरावरून ही खरेदी होणार आहे.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.

Web Title: Medical education department will procure material for Jalgaon Government Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.