जळगावात ‘आयएमए’तर्फे लवकरच ‘मेडिकल लायब्ररी’ची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:24 PM2018-08-11T12:24:00+5:302018-08-11T12:24:52+5:30
डॉक्टरांसाठी सोय
जळगाव : वैद्यकीय सेवा बजावत असताना त्यात काही संदर्भाची आवश्यकता असल्यास डॉक्टरांना हे संदर्भ वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगावच्यावतीने ‘मेडिकल लायब्ररी’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जळगाव आयएमएच्यावतीने गेल्या वर्षी आयएमए सभागृहाचा कायापालट करण्यात येऊन संपूर्ण सभागृह वातानुकुलीत करण्यात आले. यातील पुढील टप्पा म्हणून येथे अद्यायावत वाचनालय, सुसज्ज कार्यालय, स्वतंत्र शौचालय अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे आयएमएचे सचिव डॉ. विलास भोळे यांनी सांगितले. त्यानुसार येथे या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम १६ आॅगस्टपासून हाती घेण्यात येणार आहे.
‘मेडिकल लायब्ररी’तून डॉक्टरांना लाभ
वैद्यकीय शिक्षण घेत असताना या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोठे वाचनालय असते. त्याद्वारे विविध उपचार पद्धतींसह संबंधित इतर माहितीही मिळते. वैद्यकीय व्यवसाय सुरू झाल्यानंतर जळगावात अशी ‘मेडिकल लायब्ररी’च नसल्याचे आयएमए पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आयएमए सभागृहात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या ‘मेडिकल लायब्ररी’तून वैद्यकीय विषयाशी निगडीत विविध पैलूंची माहिती हवी असल्यास डॉक्टर मंडळी या ठिकाणी जाऊन पुस्तकांचे निवांतपणे वाचन करू शकतील. यातून उपचार व वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपलब्धीचीही माहिती मिळू शकणार आहे.
सुसज्ज कार्यालय
आयएमएचे कार्यालयदेखील असावे यासाठी आयएमए सभागृहातच सुसज्ज कार्यालय उभारण्याचे नियोजन असून त्याचेही काम पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार आहे.
दुसºया टप्प्यात करण्यात येणाºया या कामांतर्गत या ठिकाणी महिला तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयाचीदेखील सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मदतीसाठी सरसावले हात
आयएमए सभागृहात करण्यात येणाºया सुविधांसाठी शहरातील डॉक्टर मंडळी सरसावली असून अनेकांनी मदत केली आहे. यामध्ये ‘मेडिकल लायब्ररी’साठी डॉ. नरेंद्र दोशी यांनी मदत केली असून आयएमएसाठी मोठे कार्य करणाºया डॉ. स्वरुप लोढा यांच्या स्मरणार्थ डॉ. सुमन लोढा यांनी कार्यालयासाठी मदत केली आहे. याशिवाय डॉ. राजेश जैन, डॉ. वैशाली जैन, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. अजय शास्त्री यांनीदेखील मदत केली आहे. या सोबतच इतरही डॉक्टर मदतीसाठी इच्छुक असून त्यातून इतर कामे करण्यात येणार आहेत.
शहरात ‘मेडिकल लायब्ररी’ नसल्याने ही सुविधा आयएमए सभागृहात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच इतरही सुविधा येथे करण्यात येणार आहेत.
- डॉ. विलास भोळे, सचिव, आयएमए.