धगधगत्या काश्मीर खोऱ्यात महाराष्ट्रातील डॉक्टरांची रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:49 PM2019-05-29T12:49:50+5:302019-05-29T12:50:19+5:30
१० दिवसात ४९०० जणांवर उपचार
जळगाव : जम्मू-काश्मीर सारख्या अतिसंवेदनशील, नेहमीच अतिरेकी हल्ले, गोळीबार, सतत दहशतीचे वातावरण, अतिरेकी कारवाया याची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्यात सुधारणा व्हावी आणि त्यांना आपलेसे करावे, या हेतूने जळगाव, नाशिक येथील डॉक्टरांनी काश्मीरमधील सीमारेषेवर १० दिवस मोफत आरोग्य सेवा केली. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिराला भारतीय सैन्याने सुरक्षा देत सहकार्य केले. या आरोग्य शिबिरादरम्यान एकूण ४९०० रुग्णांनी लाभ घेतला.
जळगावचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील, ऋषिकेश परमार (नाशिक), डॉ. विवेक जोशी (नाशिक), डॉ. अमोल कासार, (संगमनेर), डॉ.शोभना गायकवाड (संगमनेर), दिनार सावंत (नाशिक), डॉ.नैना खराडे (नाशिक), डॉ.मंगेश खिल्लारी (नाशिक), डॉ.सुनील जाधव (नाशिक), डॉ भाग्येश्री बागुल (नाशिक), डॉ. शैलेश गायकवाड (संगमनेर), डॉ.सविता कासार (संगमनेर) या डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता दर वर्षी प्रमाणे भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून काश्मीर खोºयातील कुपवाडा, लढाह सेक्टर, द्रुगमुल्ला सेक्टर, मच्चील सेक्टर, केरन सेक्टर, बहत्तरगाम सेक्टर, लुनहारे सेक्टर, राशनपोरा, क्रॉलपोरा सेक्टर या अतिसंवेदनशील भागात वैद्यकीय सेवा दिली.
या आरोग्य शिबिरादरम्यान ४९०० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली. यासाठी भारतीय सैन्याने औषधींचा साठा उपलब्ध करून दिला. सोबतच डॉक्टरांच्या चमूने महाराष्ट्रातून बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्यावतीने ऋषिकेश परमार यांनी नाशिक येथून तर आर्या फाउंडेशनतर्फे डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी जळगाव येथून सोबत आणलेली सुमारे एक लाख रुपयांची औषधी रुग्णांना वितरित केली.
डॉक्टरांच्या आरोग्य सेवेला या सैन्य अधिकाऱ्यांची साथ
४१ आरआर मराठा बटालियनचे लेफ्टनंट कर्नल आकाश चिंचे, मेजर पुनीत कटारिया, कॅप्टन जसविंदर, कॅप्टन डॉ.संतोष, कॅप्टन रोशन, २४ आरआरचे ब्रिगेडियर जयंत कर, मेजर चॅटर्जी, ५ आरआर, ५६ आरआर, २४ आरआर, २८ आर्टीलरीच्या अधिकाºयांचे सहकार्य लाभले. या सोबतच भारतीय सैन्यदलातर्फे डॉक्टरांच्या निवास आणि भोजनाची सुविधा त्यांच्या सोबतच करण्यात आली. तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील घेतली गेली. शिबिराच्या ठिकाणी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एके ४७ सह जवान आणि प्रवासादरम्यान बुलेटप्रूफ वाहनसह एके ४७ हत्यारबंद जवानांसहीत असलेले दोन वाहन पुढे आणि दोन वाहन मागे अशा वाहनांच्या ताफ्यासह डॉक्टरांच्या चमुला नेण्यात येत असे. काश्मीर खोºयातील काही अतिसंवेदनशील भागात भीतीपोटी डॉक्टरदेखील जाण्यास घाबरतात. त्या भागातील गरजू रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहतात अशा ठिकाणी आरोग्य शिबिर असल्याने डॉक्टरांच्या या चमूला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली. विशेषत: केरण आणि मच्चील सेक्टर हा अतिसंवेदनशील परिसर असून या ठिकाणी कट्टर पंथीयांकडून डॉक्टरांच्या जीविताला धोका होता.
काश्मीर खोºयातील ग्रामीण भागात भीतीपोटी आरोग्यसेवेचा अभाव असल्याने तेथील जनतेला आरोग्य सुविधा देण्यात आली. तेथील जनतेच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण करणे ही केवळ भारतीय सैनिकांचीच जबाबदारी नसून आपलीही जबाबदारी आहे, या हेतूने हे कार्य सुरू आहे.
- डॉ.धर्मेंद्र पाटील, समन्वयक, बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन तथा अध्यक्ष, आर्या फाउंडेशन