वाघारी येथे कारवाईस गेलेले वैद्यकीय पथक इंजेक्शन न देता माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 11:57 PM2021-05-02T23:57:56+5:302021-05-03T00:00:17+5:30
फत्तेपूर येथे दोन डॉक्टरांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
जामनेर : वाघारी (ता. जामनेर ) येथील डॉक्टर पती -पत्नी कोरोना काळात शासन निर्देशांचे पालन न करता रुग्णावर उपचार करीत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागास मिळाल्या होत्या. आरोग्य विभागाचे पथक कारवाईसाठी वाघारी येथे गेले असता पथकाला ठोस पुरावे मिळाले नसल्याने कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राजकीय दबावामुळे डॉक्टरांना कारवाईचे इंजेक्शन आरोग्य विभागाला देता आले नसल्याची चर्चा रंगू लागली आहे, तर दुसरीकडे डॉ. देवानंद सरताळे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८६ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वाघारी व परिसरात गेल्या महिनाभरात सुमारे ३० पेक्षा जास्त कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याची चर्चा होती व तशी तक्रार जिल्हा आरोग्य विभागाकडेदेखील पोहोचली होती. या अनुषंगाने स्थानिक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. कारवाईची कुणकुण लागताच संबंधितांनी कागदपत्रांची फाइल व इतर साहित्य हलविल्याचे सांगण्यात आले.
या डॉक्टरांवर कारवाई होऊ नये यासाठी मोठा राजकीय दबाव आणण्यात आल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
फत्तेपूरला दोन रुग्णालयांवर कारवाई
फत्तेपूर व परिसरातील काही खाजगी डॉक्टर रुग्णांची कोरोना चाचणी न करता केवळ टायफॉइड व इतर रक्ताच्या चाचण्या करून अधिक प्रमाणात सलाइन लावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या परिसरातील रुग्ण हे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे दाखल होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.एस. पाटोडे यांनी इंदू हॉस्पिटल व विमल हॉस्पिटल यांची अचानक तपासणी केली. तपासणीत काही अनियमितता व काही अपूर्णता आढळून आल्या.
या पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राजपूत, मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच. माळी, आरोग्य सहायक भागवत वानखेडे, पुरुषोत्तम वाणी, सुनील पाटील, कृष्णा शिंदे, अनंता अवचार, अमोल वाघ यांचा समावेश होता.
तपासणी करण्यात आलेल्या दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली.
तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत व अपूर्ण बाबींची पूर्तता होईपर्यंत वैद्यकीय सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक पदवी व प्रमाणपत्र वाघारी येथील डॉक्टरांकडे नसतानाही रुग्णांवर उपचार केले जात होते. आवश्यक कागदपत्रे जमा करेपर्यंत दवाखाना सुरू करू नये, अशी नोटीस बजावली आहे.
-डॉ.राजेश सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, जामनेर