मातृभाषा स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 09:18 PM2018-02-27T21:18:54+5:302018-02-27T21:18:54+5:30
‘वाणी अमृताची’ कार्यक्रमाद्वारे सादर केले मराठी भाषेचे वैभव
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२७ : आपल्या जीवनात आईचे जितके महत्त्व आहे, तितकेच मातृभाषेचे महत्त्व आहे. मातृभाषेतून मानवाला व्यक्त होता येत असते. त्यामुळे मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता गंधे सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘वाणी अमृताची’ हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अशोक जोशी, कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र.कुलगुरु पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.केशव तुपे, लक्ष्मीकांत धोंड, वित्त व लेखाधिकारी बी.डी.कºहाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन झाले.
डॉ.अशोक जोशी यांनी ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६८ साली शिकागो येथे कुसुमाग्रज आल्याचे सांगितले. त्यानंतर अमेरिकेत मराठी मंडळाची स्थापना केली. त्यावेळी अमेरिकेतील पहिले मराठी मंडळ होते. आता या मंडळाची व्याप्ती वाढल्याने बृहण महाराष्ट्र मराठी मंडळात त्याचे रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले. परप्रांतात असलो तरी मराठी भाषेचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमानंतर वाणी अमृताची हा सांस्कृतिक कार्यक्रम चांगलाच रमला. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन लक्ष्मीकांत धोंड यांचे होते. सुप्रसिध्द अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री अश्विनी कासार यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पं.विश्वनाथ दाशरथे यांनी सादर केलेल्या सुर्यवंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यानंतर सारेगम फेम श्रध्दा जोशी यांनी गवळण सादर केली त्यावर जान्हवी पवार हीने नृत्य सादर केले. सारेगम फेम मुग्धा वैशंपायन यांनी ‘फुटला पान्हा तसेच हे सुरांनो चंद्र व्हा’ हे नाट्य गीत सादर केले. ना.धों.महानोर यांच्या अजिंठा या खंडकाव्यावर सादर झालेल्या नृत्य व काव्यवाचनाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. अभिषेक देशपांडे आणि शंतनु रोडे यांनी हे खंडकाव्य सादर केले. सुनंदा चौधरी यांनी अहिराणी गीत सादर केले. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता अथर्व मुळे व विश्वनाथ दाशरथे यांनी सादर केले. मुग्धा वैशंपायन यांनी ‘अरे संसार संसार’ हीकविता गायली. जळगावच्या ला.ना.शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज व साने गुरूजी यांचे समुहगीत सादर केले.