इनसे मिलिए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:17 PM2017-08-29T16:17:21+5:302017-08-29T16:18:28+5:30
लोकमतच्या ‘वीकेण्ड’ पुरवणीमधील अॅड. सुशील अत्रे यांचा लेख
वाचकपीठावरील सर्व मान्यवर आणि माङया बंधू-भगिनींनो. आजच्या आपल्या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माङयावर आली आहे. म्हणजे, मीच ती हौसेने स्वत:वर घेतलीय. ती ओळख मी आता करून देतो. हिंदीमध्ये छानपैकी सांगतो- इनसे मिलिए.. नाव- अशोक समर्थ, शिक्षण एम.ए., जन्म 1962 साली झाला. जन्मदात्याचं नाव नारायण धारप. ही एकूण पाच भावंडं आहेत. इतर चार भावंडांची नावं आहेत कृष्णचंद्र, जयदेव, भगत आणि पंत ! समर्थ या भावंडांमध्ये थोरले ! त्यांच्या जन्मदात्याने त्यांना एकच काम नेमून दिलंय- ‘अनोळखी दिशेने’ जाताना संकटात सापडलेल्या वाटसरूंना मदत करणे. हे काम त्यांनी सतत इमाने-इतबारे केलंय.. हे सगळं फारच कोडय़ात टाकणारं वाटतंय का? जाऊ द्या स्पष्टच सांगतो. माङया अत्यंत आवडत्या लेखकांपैकी एक म्हणजे नारायण धारप. माङया अंदाजाप्रमाणे धारपांची प्रत्येक कथा आणि कादंबरी मी वाचलीय. भयकथा आणि विज्ञानकथा या दोन्ही प्रकारच्या लेखनांमध्ये धारपांचे श्रेष्ठत्व वादातीत आहे. पण लिखाणासाठी जे क्षेत्र धारपांनी निवडलं, ती म्हणजे त्यांच्याच शब्दांमध्ये ‘अनोळखी दिशा’ होती त्या काळी. त्यामुळे उत्कृष्ट कथालेखक असूनही आघाडीच्या लेखकांमध्ये त्यांचं नाव सहसा दिसत नाही. किंबहुना मराठी कथाविश्वातले दृढ्ढाचार्य ‘भयकथा लेखक’ म्हटल्यावर तुच्छतेनेच बघतात. फार कशाला ‘माङो आवडते लेखक नारायण धारप आहेत’, असं सांगितल्यावर अनेक ‘अभिजात साहित्यप्रेमींनी’ नाकं मुरडली आहेत. त्यांच्या मते मी काहीतरी ‘दज्रेदार’ वाचन करावं आणि लेखक म्हणून नावं घेताना जी.ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे वगैरे लेखकांची नावं घेतली तर बरं! त्यांचा अपेक्षाभंग करताना मला खेद होतोय. पण.. पण आजही माङो लाडके लेखक नारायण धारपच आहेत आणि त्यांचे मानसपुत्र ‘समर्थ’ हे माझं आवडतं पात्र आहे. म्हणूनच मी समर्थाची ओळख करून देतोय. ‘अशोक समर्थ’ असं नाव असलं तरी सगळ्या कथांमध्ये ते ‘समर्थ’ एवढय़ाच नावाने वावरतात. त्यांचे सहाय्यक आहेत आप्पा जोशी. समर्थ आणि आप्पा ही जोडगोळी शेरलॉक होम्स आणि डॉ.व्ॉाटसन यांच्यावरून बेतलेली आहे, हे उघडच आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, स्वभावात खूपच अंतर आहे. शेरलॉक हा अत्यंत कठोर, तर्कनिष्ठ आणि भावनाहीन म्हणावा असा गुप्तहेर आहे. त्यांचा कोणत्याही अतिमानवी वा अद्भुत गोष्टींवर काडीइतकाही विश्वास नाही. तो 100 टक्के मानवी पातळीवर काम करतो. या उलट, समर्थ मात्र स्वभावाने अत्यंत मृदू, प्रसन्न आणि भावनाशील आहेत. त्यांचा अतिमानवी शक्तीवर विश्वास तर आहेच पण ते स्वत: दैवी शक्तीचे श्रेष्ठ उपासक आहेत. त्यांना स्वत:लाच कित्येक अतींद्रिय, दैवी शक्ती प्राप्त झाल्या आहेत. या शक्तींचा वापर ते नेहमीच दुष्ट शक्तींविरुद्ध करतात, आणि यशस्वीही होतात. शुभ आणि अशुभ यांच्या संघर्षात ‘शुभ’ नेहमीच विजयी होईल हा समर्थाचा दृढविश्वास आहे. कारण तो स्वत: नारायण धारपांचाही होता. 1962 साली ‘अद्भुत’ नावाच्या दिवाळी अंकामध्ये ‘असला प्रकाश नको’ ही कथा प्रसिद्ध झाली आणि ‘समर्थ’ हे व्यक्तिमत्व जन्माला आलं. तेव्हापासून अनेक प्रकरणांमध्ये समर्थानी आप्पांच्या मदतीने भयानक दुष्ट शक्तींच्या कचाटय़ात सापडलेल्या अनेक अभागी जीवांना सोडवलंय ! समर्थाचं व्यक्तिमत्त्वच एवढं असं आश्वासक आहे, की त्यांची नुसती भेट झाली, तरी त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या माणसाला हायसं वाटायला लागतं. तो प्रसंग वाचणा:या आपल्यासारख्या वाचकालासुद्धा कुठेतरी, मनातल्या मनात सुटल्यासारखं वाटतं, आणि मग आपला अजिबात अपेक्षाभंग न करता समर्थ आपली सगळी शक्ती पणाला लावून लढा देतात. आणि अखेर ती अमंगळाची काळी छाया दूर करतात. हा सर्व प्रवास अगदी श्वास रोखून धरणारा असतो. धारप एकाही कथेत आपली वाचकांवरची पकड सुटू देत नाहीत. समर्थ एकदाचे विजयी झाले, की वाचणाराही सुटकेचा नि:श्वास टाकतो! एका बुद्धिवादी मित्राने मला एकदा हेटाळणीच्या स्वरात विचारलं, ‘तुझा या भुता-खेतांवर विश्वास आहे?’ मी त्याला इतकंच म्हटलं, की माझा मनोरंजनावर विश्वास आहे, लहानपणावर विश्वास आहे. आयुष्यात कित्येकदा, उद्विगA मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी ‘शहाणपण’ नव्हे, तर ‘लहानपण’ उपयोगी पडतं. ते जपावं प्रत्येकानं. त्यासाठी एखादा सुपरमॅन, एखादा शेरलॉक होम्स किंवा एखादे समर्थ उपयोगाला येतात. म्हणूनच, मित्र हो, आजच्या पाहुण्यांची ओळख विसरू नका- अशोक समर्थ. एम.ए. !