तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:43+5:302021-06-17T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : कोरोनाची पहिली व दुसरी लाट यानंतर आता तिसरी लाट येणार याबाबत संभ्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : कोरोनाची पहिली व दुसरी लाट यानंतर आता तिसरी लाट येणार याबाबत संभ्रम असला तरी पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव घेत व कुठलाही "रिस्क फॅक्टर नको" या दृष्टिकोनातून प्रांताधिकारी कार्यालयात प्रांत रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे तसेच बालरोगतज्ज्ञ खासगी डॉक्टरांची बैठक झाली. इन्फ्लुएंझा लसीबाबत यावेळी चर्चा करून विचारविनिमय करण्यात आला.
कोरोनाची दुसरी लाट जवळपास शांत झाली असून, संभाव्य तिसरी लाट बालकांसाठी धोक्याची असू शकते या पार्श्वभूमीवर कुठलीही रिस्क नको याकरिता प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. यात शहरातील सर्व खासगी बालरोगतज्ज्ञांनी प्रशासनास १०० टक्के सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बालरोगतज्ज्ञांना कोविड तपासणीसाठी किट उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना प्रांताधिकारी सुलाने यांनी केल्या. येत्या काही दिवसांत रेल्वे हॉस्पिटल, खासगी बागरोगतज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय येथे बेड उपचारासाठी नियोजन म्हणून सज्ज ठेवावे, असेही प्रांताधिकाऱ्यांनी सुचवले.
डॉ. रेखा पाटील यांच्या रुग्णालयाला कोविड सेंटरची परवानगी
शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील यांच्या हॉस्पिटलला लहान मुलांसाठी कोविड सेंटरची परवानगी मिळाली आहे. हॉस्पिटलमध्ये १० स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. येणारी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.
साहित्य, औषधी, उपकरणे लवकरच होणार उपलब्ध
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वेळेवर धावपळ नको याकरिता उपचारासाठी आवश्यक ते साहित्य, औषधी, उपकरणे शासकीय स्तरावरून लवकरच खरेदी केले जाणार असून, याकरिता शासनाकडे प्रस्ताव दिला जाईल. उपचारांसाठी कुठलीही असुविधा होऊ नये याची आतापासूनच दक्षता घेण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
इन्फ्लुएंझाबाबत जनजागृतीवर भर
बालकांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी करण्यासाठी इन्फ्लुएंजा लस गुणकारी ठरते. सद्य:स्थितीत ही खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ही लस बालकांना द्यावी यासाठी पालकांमध्ये जनजागृती करावी, अशीही अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली. मुलांसाठी स्वतंत्र कोरोना लस येईल याची वाट पालक पाहत आहे, तोपर्यंत कोरोना झाल्यास लक्षणे व त्रास कमी करण्यासाठी इन्फ्लुएंजा महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीला पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता पांढरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसीफ खान, डॉ. अतीया खान, डॉ. अरशिया शेख, डॉ. संदीप जैन, बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश अत्तरदे, डॉ. रेखा पाटील, डॉ. पंकज राणे, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. नीलिमा नेहेते, डाॅ. अमित देवडा, डॉ. अवनी ढाके, डॉ. सुमित महाजन, डॉ. हेमंत अग्रवाल, मुस्कान हॉस्पिटलचे डॉ. तौसीफ खान उपस्थित होते.