नेहरू युवा केंद्राच्या सल्लागार समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:45+5:302021-02-20T04:46:45+5:30
जळगाव - नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण भागात युवक गट ...
जळगाव - नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण
भागात युवक गट स्थापन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. जिल्हा नेहरू युवा कार्यक्रम सल्लागार समितीची
बैठक नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राचे
जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे एस.बी. पाटील, नारायण पाटील, मिलिंद दीक्षित, डॉ.पंकजकुमार
नन्नवरे, अनिल भोकरे,एस.एस. भोलाणे, संजय बेलोरकर, प्रमोद बारके, विनोद बियाणी, विनोद ढगे, अजिंक्य गवळी, रणजीत राजपूत आदी
उपस्थित होते.
सुप्रिम कॉलनीत पाणी पुरठ्याचा आज शुभारंभ
जळगाव - शहरातील सुप्रीम कॉलनीतील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली
असून जोडणीसह सर्व काम पूर्ण झाले आहे. भूमीगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली असता ती यशस्वी ठरल्याने पाणी
पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला असून, शनिवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, महापौर
भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होणार आहे.
शिवसेनेचे २४ पासून शिवसंपर्क अभियान
जळगाव - शिवसेनेच्या रावेर लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रानिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पद्मालय विश्रामगृहात
घेण्यात आली. २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रावेर मतदारसंघात शिव संपर्क अभियान राबविले जाणार असून, या उपक्रमाची माहिती या
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर व
जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या अभियानातंर्गत गावा-गावात जाऊन शिवसेनेच्या शाखा उघडण्याचा
उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवसैनिकांनी प्रत्येक गावात हे अभियान राबविण्याचा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
मास्क न घालणाऱ्या ७७ जणांना दंड
जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक नागरिक अजूनही मास्कचा वापर करताना दिसून येत नाही. शुक्रवारी
मनपाच्या पथकाकडून मास्क लावणाऱ्यांवर कारवाईची हाती घेण्यात आली होती. एकूण ७७ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मोकाट कुत्रे निर्बीजीकरणासाठी निवीदा
जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असून, मनपाने अमरावती येथील कंपनीला दिलेला मक्ता रद्द केल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. याबाबत पुढील स्थायी समितीच्या सभेत मनपाकडून हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मनपा महासभेसमोर ३० विषयांचे प्रस्ताव
जळगाव - मनपाच्या महासभेचे आयोजन २६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. पुढच्या महिन्यात नवीन महापौरांची निवड होणार आहे. त्यामुळे ही सभा महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखालील शेवटची सभा असणार आहे त्यामुळे या सभेत शहरातील गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित विषयांना मंजुरी देण्याची लगबग सुरू झाली आहे महासभेसाठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यात ३० विषयांचा समावेश करण्यात आला आहे.