विरोधकांच्या गोंधळातच जळगाव ग.स.ची सभा गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 06:12 PM2018-08-05T18:12:59+5:302018-08-05T18:14:57+5:30

वादग्रस्त विषयावर टाळली चर्चा

the meeting of Jalgaon GS was wrapped up | विरोधकांच्या गोंधळातच जळगाव ग.स.ची सभा गुंडाळली

विरोधकांच्या गोंधळातच जळगाव ग.स.ची सभा गुंडाळली

Next
ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांची खेळी विरोधी सदस्याला ढकलले सभा सुरू असताना सभासद भत्ता घेण्यात मग्न

जळगाव : ग.स. सोसायटीमधील सहकार गटाचे नेते बी.बी. पाटील यांच्या मुलाच्या नावे ५० लाखांच्या ठेवीचा विषय, अमळनेरातील इमारत विक्रीचा घोळ आदी वादग्रस्त विषयांवर चर्चा टाळण्यासाठी विरोधकांना बोलण्याची संधीच न देता ग.स.ची सभा गुंडाळण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. जाब विचारण्यासाठी व्यासपीठावर चढलेल्या विरोधी गटाच्या सभासदाला व्यासपीठावरून सरळ खाली ढकलून देण्यात आल्याची घटना यावेळी घडली.
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. म्हणजेच ग.स. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी चेअरमन विलास नेरकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर सहकार गटाचे नेते बी.बी. पाटील, उपाध्यक्ष कैलासनाथ चव्हाण, सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, संचालक मनोज पाटील, अजबसिंग पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, ग.स. प्रबोधिनी अध्यक्ष तुकाराम बोराले, शामकांत भदाणे, विक्रमादित्य पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील निंबा पाटील यांच्यासह सर्व संचालक तसेच माजी चेअरमन उपस्थित होते.
बरोबर ११ वाजता सभेला सुरूवात झाली. मात्र सुरूवातीपासूनच विरोधकांकडून गोंधळ सुरू झाला. प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे सहकाºयांसह तेथे आले. दरम्यान चेअरमन विलास नेरकर यांनी विरोधकांपैकी दोघांना प्रातिनिधीक स्वरूपात म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले. त्यामुळे विरोधक शांत झाले. चेअरमन विलास नेरकर यांनी प्रास्ताविक करीत विषयांचे वाचन सुरू केले. सभेचा भत्ता ५०० रूपये ठरला होता. मात्र तो वाढविण्याची मागणी असल्याने ६०० रूपये केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ८ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले. सहकार कायद्यातील दुरुस्तीनुसार बिगर सभासद ठेवीदांचा सुमारे २०० कोटींच्या ठेवी परत कराव्या लागणार असून तिमाही व्याज आकारणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यावर आक्षेप घेत विरोधकांनी आम्हालाही बोलू द्या, म्हणत घोषणाबाजी केली. मात्र नेरकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन करतानाच संस्थेच्या प्रगतीचे गुणगान करीत विषय भरकटवताच विरोधक पुन्हा चिडले. मुद्यावर बोला म्हणून मागणी झाली. त्यातच काहींनी आम्हाला बोलू द्या, म्हणून मागणी करताच गोंधळ सुरू झाला. सदस्य उठून उभे राहिले व व्यासपीठाजवळ पोहोचले.

विरोधकाला स्टेजवरून ढकलले
विरोधकांना बोलू द्या अशी मागणी करीत रावसाहेब पाटील तसेच अनेक सदस्य व्यासपीठावर पोहोचले. भडगाव येथील राकेश मधुकर पाटील हे सदस्य विरोधकांनाही बोलू द्या, अशी मागणी करीत व्यासपीठावर चढले. तेथे सत्ताधारी गटातील मनोज पाटील व अन्य संचालकांशी त्यांचा वाद झाला. त्यातच त्यांना सत्ताधारी संचालकांनी ढकलल्याने ते स्टेजवरून खाली कोसळले.

अन् वाद वाढला
विरोधी सदस्याला स्टेजवरून खाली ढकलल्याने विरोधक चिडले. त्यामुळे मनोज पाटील व अन्य काही सदस्यांना गर्दीतून काढून स्टेजवरच मागे असलेल्या खुर्च्यांवर नेऊन बसवण्यात आले. मात्र तोपर्यंत गोंधळ वाढून स्टेजवर विरोधी सदस्यही दाखल झाले होते. त्यातच सत्ताधारी गटातील एका सदस्याने माईक पळवून नेला. त्यामुळे विरोधकांनी हा आवाज दडपण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत गोंधळ घातला.

पोलिस व्यासपीठावर दाखल
ढकला-ढकलीच्या प्रकारानंतर गोंधळ वाढल्याने आधीच उपस्थित असलेले पोलीस थेट व्यासपीठावर आले. त्यामुळे वातावरण निवळले.

सभा झाल्याचा सत्ताधाºयांचा दावा
एकही विषय सभेत मांडला गेलेला नसल्याने सभा झालेली नसल्याचे सांगत विरोधक निघून गेले. त्यानंतर राष्टÑगीत म्हणून सभेचा समारोप करण्यात आला. तसेच सभेत सर्व विषय मंजूर झाल्याचा दावा सत्ताधाºयांकडून करण्यात आला.

सभासद भत्ता घेण्यात मग्न
ग.स.चे सुमारे ३८ हजार सभासद आहेत. त्यांना ६०० रूपये मिटिंग भत्ता देण्यात आला. त्याचे वाटप सकाळी ७.३० वाजेपासूनच नूतन मराठा महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू होते. १५ तालुक्यांसाठी ५२ बुथ वरून हा भत्ता वाटप सुरू होती. त्यासाठी सभासदांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे सभा ११ वाजता सुरू झाली तरीही ९० टक्के सभासद भत्ता घेण्यासाठी रांगेतच उभे होते किंवा काही सभेसाठी बाहेरगावाहून येत होते. त्यामुळे सभेला सभागृहात जेमतेम हजार सभासद उपस्थित होते.

Web Title: the meeting of Jalgaon GS was wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.