अमळनेर येथे तब्बल १६ वर्षांनंतर झाली खान्देश शिक्षण मंडळाची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 06:15 PM2018-12-17T18:15:19+5:302018-12-17T18:16:41+5:30
खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्यात यावी आणि पोस्टल बॅलेटच्या निर्णयाला सभासदांनी जोरदार विरोध केला. तसेच घटना दुरुस्तीच्या मुद्यावर सभा चांगलीच गाजली.
अमळनेर, जि.जळगाव : खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्यात यावी आणि पोस्टल बॅलेटच्या निर्णयाला सभासदांनी जोरदार विरोध केला. तसेच घटना दुरुस्तीच्या मुद्यावर सभा चांगलीच गाजली. दरम्यान, सभेचे अजेंडे सभासदांना न देता बिगर सभासदांना देण्यात आल्याचे टीका करण्यात आली. तब्बल १६ वर्षांनंतर ही सभा झाली.
यापूर्वी सन २००२ मध्ये सभा झाली होती. त्यानंतर ही सभा घेण्यात आली.
खान्देश शिक्षण मंडळाच्या सभासदांची बैठक रविवार १६ रोजी झाली. त्यात हा विरोध करण्यात आला. प्रताप महाविद्यालयाच्या नाट्यगृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम होते.
संस्थेच्या लेखपरीक्षणावर लेखा परीक्षकांनी आक्षेप घेतल्याचे सांगून माजी अध्यक्ष विवेक भांडारकर यांनी त्रुटींचा पाढाच वाचला, तर अनेक सदस्यांनी सभेचा अजेंडा मिळाला नसल्याचे सांगितले तर प्रसाद शर्मा यांनी लायन्स क्लब संस्थेचे सदस्य नसताना त्यांना अजेंडा मिळाल्याचे सांगितले.
सचिव प्रा.ए.बी. जैन यांनी सभेला सुरुवात करताच अनेक सदस्यांनी सभेचा अजेंडा मिळाला नसल्याचे सांगितले तर प्रसाद शर्मा यांनी लायन्स क्लब संस्थेचे सदस्य नसताना त्यांना अजेंडा मिळाल्याचे सांगितले.
संस्थेच्या लेखपरीक्षणावर लेखा परीक्षकांनी आक्षेप घेतल्याचे सांगून माजी अध्यक्ष विवेक भांडारकर यांनी त्रुटींचा पाढाच वाचला. संस्थेचा हिशोब नियमित नाही, कीर्द खतावणी मूळ प्रतीत नाहीत, ३१ मार्च २००२ पर्यंतचा व्यवहार खात्रीशीर वाटत नाही. विश्वस्तांच्या ताब्यात संस्थेचे मालमत्ता रजिस्टर नाही, सायकल स्टॅण्ड आणि मुलांच्या हॉस्टेलचे उत्पन्न कोणत्या खात्यात जमा केला याचा हिशोब नाही, नवीन इमारत किंवा इमारत दुरुस्तीबाबत टेंडर काढले जात नाही, कर्मचाऱ्यांचा टी.डी.एस. कापला जातो पण तो वेळेवर भरला जात नाही, विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या विकास निधीची नोंद नाही, असे अनेक ताशेरे लेखा परीक्षकांनी ओढल्याचे भांडारकर यांनी सांगितले.
दरम्यान, तत्कालीन संचालकांच्या दोष आणि सन २००६ ते २००९ दरम्यानचे दप्तर पोलिसात जमा असल्याने न्यायालयीन निर्णयाला अधीन राहून लेखा परीक्षणाला मंजुरी देण्यात आली. लोटन चौधरी यांनी १६ वर्षानंतर लेखापरीक्षण केल्याबद्दल कार्यकारी मंडळ आणि अध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
घटना दुरुस्तीच्या विषयावर अॅड. अशोक मोरे यांनी आक्षेप घेत यावर समिती नेमणे चुकीचे असल्याचे सांगितले. यावर सचिवांनी घटना समिती नेमण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाला असल्याचे सांगितले.
सामान्य सभासद, फेलो, पेट्रेन, व्हॉ. पेट्रेन यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदाराला सभासदत्व देण्यात यावे, ही मागणी मंजूर करण्यात आली. कार्यकारी मंडळ ठरवेल ती अनामत रक्कम ठेवावी, या दुरुस्तीला तसेच फक्त जळगाव व धुळे जिल्ह्यातील सभासद निवडणूक लढवू शकतील या निर्णयाला सभासदानी विरोध केला आणि यापुढे अजेंडा घटना दुरुस्ती आदी विषय मराठीत देण्याची मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत माजी संचालक डॉ. अनिल शिंदे, लोटन चौधरी, प्रसाद शर्मा, विवेक भांडारकर, शीतल देशमुख, उमाकांत नाईक, चंद्रशेखर भावसार, सुरेश पाटील, शिवाजीराव पाटील, सुरेश पाटील, अशोक साळुंखे, राजेंद्र सुतार, संजय पाटील, जयवंत साळुंखे, संजय साटोडे यांनी भाग घेतला.
बैठकीस मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, उपकार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक डॉ. बी.एस. पाटील, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, संदेश गुजराथी, कल्याण पाटील, हरी भिका वाणी, विश्वस्त वसुंधरा लांडगे, उपाध्यक्ष कमल कोचर, माधुरी पाटील, माजी चेअरमन गोविंद मुंदडा, कुंदन अग्रवाल, बजरंग अग्रवाल, विनोद पाटील, डॉ.बी.आर. बाविस्कर, प्रा.शीला पाटील, राजू महाल, सुभाष अग्रवाल यांच्यासह सदस्य उपस्थित होते.