यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीच्या सभेत विरोधी गटाच्या सदस्यांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 08:18 PM2018-12-01T20:18:54+5:302018-12-01T20:20:41+5:30
साकळी येथील ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी शुक्रवारी सभात्याग केला.
यावल, जि.जळगाव : तालुक्यातील साकळी येथील ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी शुक्रवारी सभात्याग केला.
साकळी येथील उर्दू शाळेसमोर असलेल्या पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सभात्याग करत सभा संपेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन दिले.
ग्रामस्थांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हाल्वची पूजा-अर्चा केली. गावातील सार्वजनिक समस्येसाठी अशा प्रकारे प्रथमच आणि अनोखे आंदोलन झाल्याने या आंदोलनाची गावात चर्चा होती.
सात-आठ महिन्यांपासून निवेदन देऊनही समस्या न सुटल्याने ३० रोजी झालेल्या मासिक सभेत जगदीश मराठे, सैय्यद अशफाक, बेबाबाई चौधरी, नीलिमा नेवे यांनी सभात्याग केला.
या वेळी जि.प.चे माजी सदस्य वसंतराव महाजन यांनी आपली संतप्त भूमिका मांडताना सांगितले की, अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे काही महिन्यांपूर्वी अतिसाराची लागण होऊन एक नऊ वर्षीय बालिका दगावली होती, असा दुर्लक्षित कारभार करून अजून किती लोकांचा जीव घेणार?
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी डी.आर. निकुंभ यांनी आंदोलन ठिकाणी येऊन समस्या जाणून घेतली व लवकरात लवकर सोडविणार असल्याचे उपस्थितांसमोर सांगितले.
याप्रसंगी जीवन बडगुजर, सचिन चौधरी, संतोष महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
व्हॉल्व्हची दुरूस्ती वेळोवेळी केलेली आहे. विरोधकांजवळ कोणताही मुद्दा नसल्याने विरोधक स्टंटबाजी करीत आहेत. प्रस्तावित राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावातील सर्व जीर्ण व्हॉल्व्ह बदलून नवीन व्हॉव्हल बसविण्यात येतील.
-सुषमा पाटील, सरपंच, साकळी, ता.यावल