सर्व पक्षीय सदस्यांनी रोखली जळगाव जि.प.च्या स्थायी समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:49 PM2019-11-17T12:49:01+5:302019-11-17T12:49:36+5:30
१० कोटींच्या काम वाटपात दुजाभाव
जळगाव : १० कोटींच्या कामांच्या वाटपात दुजाभाव केल्याच्या आरोपावरुन सर्वपक्षीय सदस्यांनी आज जि.प. च्या स्थायी समितीत धडक मारली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी सभा आटोपल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी यात हस्तक्षेप केला आणि या कामांना स्थगिती दिल्याने या वादावर पडदा पडला.
जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला काही कोटींचा निधी आला होता. उर्वरित १० कोटी अर्थात तीस टक्के निधीबाबत अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना सर्व अधिकार देण्यात आले होते़ मात्र, आपल्याला अंधरात ठेवत अध्यक्षा, उपाध्यक्ष, सभापती, गटनेते व काही सदस्यांनी या निधीतून परस्पर कामे टाकल्याचा आरोप झाला.
शनिवारी स्थायी समितीची सभा सुरु होती. यात लालचंद पाटील, गजेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, जयश्री पाटील, डॉ़ निलीमा पाटील, जयश्री पाटील, रवींद्र पाटील, कैलास सरोदे, मिना पाटील, प्रमिला पाटील, गोपाळ चौधरी आदींसह पंधरा ते वीस सदस्यांनीअचानक या ठिकाणी धडक दिली व उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना अतिरिक्त कामांबाबत जाब विचारला़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील उपस्थित नसल्याने त्यांना सर्व अधिकार आहेत, त्यांना याबाबत माहिती असल्याने त्या आपल्या शंकांचे निरसन करतील, असे उपाध्यक्षांनी सांगितले़
दरम्यान, हा प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही सर्वपक्षीय सदस्य उपोषणाला बसू असा पवित्रा सदस्य लालचंद पाटील यांनी घेतला होता़ ४५ हजार लोकांमधून आम्ही निवडून येतो, कामे नसल्याने लोक आम्हाला जाब विचारतात, अशा शब्दात त्यांएनी संताप व्यक्त केला़
एक चर्चा अशीही
अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना कामांचे वाटप करण्याचे सर्व अधिकार सभेत देण्यात आले होते़ याला अनेक सदस्यांचा विरोध होता, मात्र, ज्यांनी अधिकार दिले त्यांनाच कामांपासून वंचित ठेवण्यात आल्याचेही बोलले जात होते़
तुम्ही मान्य करा आम्ही सोडून देऊ़़
अतिरिक्त कामांच्या मुद्द्यांवरून सदस्यांनी संतप्त भावना मांडल्या़ अधिकाऱ्यांना जाब विचारला, शिक्षणाधिकारी स्वल्पविराम देऊन देऊन कामाला बगल देतात.असेही ते म्हणाले. ,
मधू काटे यांनी किती कामे टाकली ते मान्य करावीत आम्ही निधीचा विषय सोडून देऊ, असा टोलाही पाटील यांनी लगावला़ आम्ही नवीन असल्याने आम्हाला काही समजत नाही, असे गृहीत धरून आम्हाला अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला़
गटनेत्यांना घेराव
भाजपचे गटनेते तथा शिक्षण सभापती पोपट भोळे यांना या संतप्त सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर घेराव घातला़ जाब विचारला त्यानंतर पोपट भोळे हे पूर्ण सभा बाहेरच थांबून होते़ त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष डॉ़ संजीव पाटील आले त्यांनी पोपट भोळे यांच्यासोबत वेगळ्या दालनात चर्चा केली त्यानंतर ते भाजप कार्यालयात निघून गेले़
जि़ प़ ते भाजप कार्यालय
संतप्त सदस्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ़ संजीव पाटील यांची भाजप कार्यालयात भेट घेतली. जिल्हाध्यक्षांनी जि.प.अध्यक्षांशी संपर्क साधून कामे थांबविण्याची सूचना केली. तसेच यासाठी आमदार गिरीश महाजन यांच्याशी बोलणे करू, असे आश्वासन दिले़