शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांबांच्या कामाबाबत उद्या बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:56+5:302021-05-27T04:16:56+5:30
पालकमंत्री घेणार आढावा : मनपा नाही तर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे थांबले काम ? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...
पालकमंत्री घेणार आढावा : मनपा नाही तर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे थांबले काम ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असून, पुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेले विद्युतखांब स्थलांतर करण्याबाबत शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनेक महिन्यांपासून हे काम रखडले असून, या बैठकीत विद्युतखांब स्थलांतर करण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.
फेब्रुवारी २०१९मध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम सप्टेंबर २०२०पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या कामावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच या पुलाच्या बांधकामाला मुख्य अडथळा महावितरणचे विद्युत खांब ठरत आहेत. विद्युत खांब स्थलांतर होत नसल्याने या पुलाचे काम रखडत जात आहे. हे काम करण्याची जबाबदारी महावितरणची होती. मात्र, निधी नसल्याचे कारण देत महावितरण कंपनीने या कामास चालढकल केली. तसेच मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळेदेखील या कामाला मोठा फटका बसला आहे. ‘लोकमत’ने याबाबत बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विद्युत खांब स्थलांतर करण्याबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीचे नियोजन आता करण्यात आले आहे. त्रिसदस्यीय समितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व आमदार सुरेश भोळे यांचा समावेश आहे. ही बैठक गुरुवारी होणार होती. मात्र, पालकमंत्री मुंबईत असल्यामुळे आता ही बैठक शुक्रवारी होणार आहे.
अंदाजपत्रक देण्यास महावितरणने केला उशीर
शिवाजीनगर उड्डाणपुलाला अडथळा ठरणारे विद्युत खांब स्थलांतर करण्याची जबाबदारी महावितरणकडे होती. मात्र, महावितरण कंपनीने तब्बल वर्षभर या कामाबाबत उदासीनता दाखवली. मनपा प्रशासनाने शहराच्या विकासकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून हे काम मार्गी लावण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात ठराव करून घेतला. ठराव केल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाने महावितरण कंपनीला पत्र पाठवून, या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, महावितरण कंपनीने तब्बल दोन महिने मनपाकडे अंदाजपत्रक पाठवलेच नसल्याने या कामाला उशीर झाल्याचा दावा आता मनपा प्रशासनाने केला आहे. याबाबत झालेल्या पत्रव्यवहाराची माहितीदेखील मनपा प्रशासनाकडून ‘लोकमत’कडे देण्यात आली आहे. यावरून महावितरण कंपनीच्या उदासीनतेमुळे हे काम रखडत असल्याचेही आता समोर येत आहे.
दोन वेगवेगळी अंदाजपत्रके सादर
महावितरण कंपनीने मनपा प्रशासनाला दोन अंदाजपत्रके सादर केली असून, शिवाजीनगर भागातील विद्युत खांब हटवण्यासाठी ६७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, तर दुसऱ्या अंदाजपत्रकानुसार जिल्हा परिषद ते टावर चौकपर्यंतचे विद्युत खांब हटवण्यासाठी ८२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने ३० एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर तीन सदस्यीय समितीची बैठकदेखील होणे अपेक्षित होते. मात्र, महिनाभराच्या उशिराने आता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.