मेगा रिचार्ज, रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासह महिलांसाठी उद्योग उभारणीवर राहणार भर - खासदार रक्षा खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:57 AM2019-06-06T11:57:54+5:302019-06-06T11:58:12+5:30
‘लोकमत’ भेटी दरम्यान दिली विकास कामांच्या नियोजनाची माहिती
जळगाव : दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून यंदाही कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. ही परिस्थिती पाहता मेगा रिचार्जचे काम पूर्ण करण्यासह भुसावळमध्ये येऊ घातलेले रेल्वेचे विविध प्रकल्प पूर्ण करणे तसेच महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्यासाठी विविध उद्योग उभारण्याचा आपला मनोदय आहे, अशी माहिती रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर रक्षा खडसे यांनी जळगाव येथे ‘लोकमत’ कार्यालयाला मंगळवार, ४ जून रोजी सदीच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह रेल्वेचे प्रकल्प, बँकिंग क्षेत्र, खासदारांना मिळणारा कामाचा वेळ या विषयी माहिती देत निवडणुकांमधील मुद्दे तसेच त्यातून होणाऱ्या गंमती-जमती या विषयीदेखील मनमोकळ््या गप्पा मारल्या. या वेळी भाजपच्या युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक फालक उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी खासदार रक्षा खडसे यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
प्रश्न - वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आपल्या यशात मोठा वाटा आहे का?
उत्तर - हो नक्कीच. पाच वर्षामध्ये उज्ज्वला गॅस योजना, कर्जमाफी यासह विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या. सोबतच मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्या गाठीभेठीही घेत राहिले. या सोबतच पक्षाचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ ज्यामध्ये शक्ती केंद्र, विस्तारक, पेज प्रमुख ही सर्व यंत्रणा गावागावात होती, त्यामुळेही यश मिळण्यास मोठा हातभार लागला.
प्रश्न - गेल्या पाच वर्षात अनेक कामे झाली, आता पुढे कोणती कामे प्राधान्याने करणार?
उत्तर - पाण्याच्या नियोजनास सर्व प्रथम प्राधान्य राहणार आहे. या वर्षी पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शेती, उद्योग, व्यापार धोक्यात येण्याची चिन्हे आहे. त्यामुळे मेगा रिचार्जचे काम मार्गी लावणे गरेजेचे आहे. त्यास अजून १० वर्षे लागतील, मात्र त्याचे काम सुरु करणे तरी आवश्यक असून त्यासाठी आपणा बैठकादेखील घेणार आहोत. त्यासाठी मतदार संघात मतदारांना आवाहन करून त्यांचाही पाण्याच्या नियोजनात सहभाग वाढविणार आहे. या सोबतच प्रमुख रस्ते राष्ट्रीय महामार्गात वर्ग करणे, विमानसेवा सुरळीत सुरू करणे यासाठी प्रयत्न झाल्यास त्याचा जिल्ह्याला अधिक फायदा होईल.
प्रश्न - लोकप्रतिनिधींच्या कामांचे विभाजन झाले पाहिजे, असे आपल्यास वाटते का?
उत्तर - हो, प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या कामाचे विभाजन झाले पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य, पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, आमदार, खासदार यांच्या कामात फरक आहे. त्यामुळे त्यांच्या कामांचे विभाजन होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे काम त्यांनाच सांगितले गेले पाहिजे. खासदारांनी संसदेत अधिक वेळ दिला तर जास्तीत योजनांचा लाभ मतदारसंघाला मिळवून देता येऊ शकतो.
प्रश्न - पाच वर्षात खासदार निधी खर्च झाला का?
उत्तर - हो, हा निधी खर्च झाला. जी कामे प्रक्रियेत होती, त्यांचा उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या अहवालात नव्हता. त्यामुळे माझ्या खर्चाच्या व कामाच्या अहवालातही त्याचा उल्लेख नव्हता.
प्रश्न - काही जिल्हास्तरीय समितींच्या बैठका लावण्यास प्रशासनाकडून दुर्लक्ष होते का?
उत्तर - हो, तसे होत असते. आता जिल्ह्यात वरिष्ठ खासदार (सिनिअर) मीच असल्याने त्या विषयी मलाच लक्ष द्यावे लागणार आहे. ६ जून रोजी बैठक असून त्याविषयी चर्चा करण्यात येईल. अनेकांचे घरकूल, बँक या विषयाशी निगडीत प्रश्न असतात. बँकांच्या शाखा कमी असण्यासह मनुष्यबळाचा प्रश्न आहे. त्यामुळे ग्राहकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागते. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला भर राहणार आहे.
प्रश्न - उद्योगांबाबत काय नियोजन आहे ?
उत्तर - भुसावळ औद्योगिक वसाहतीमध्ये रेल्वेचा एक प्रकल्प येत आहे. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासोबतच रेल्वेचे आणखी प्रकल्प भुसावळात आणणार आहे. हे करीत असताना उद्योगांसाठी सुविधाही असणे गरेजेचे आहे. त्यासाठी विमानसेवा सुरू करणे, पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे आवश्यक आहे.
प्रश्न - राज्यातील नितीन गडकरी यांच्याकडे लघु व मध्यम उद्योग हे खाते असल्याने त्याचा आपल्या जिल्ह्यासाठी फायदा करून घेणार का ?
उत्तर - हो नक्कीच. सध्या पंचायत समितीच्या माध्यमातून बचत गटांना प्रशिक्षण दिले जात असून ‘रुबन’ योजनेंतर्गत मतदार संघात सुरु असलेल्या प्रकल्पांच्या निधीच्या १० टक्के निधी मिळतो. यात २० ते २५ कोटी रुपये येणार आहेत. यात मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावातील १५० महिलांसाठी एक केंद्र सुरू करणार असून त्यात २५० ते ३०० महिलांना काम मिळेल. त्यासाठी सव्वा कोटी रुपये मंजूरदेखील झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात महिलांसाठी मी शिवण कामाचे वर्ग घेतले व त्यांना शाळांच्या गणवेशाचे काम मिळवून दिले. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प असून प्रत्येक तालुक्यात तो सुरू करून महिलांच्या हाताला काम मिळवून देणार आहे.
प्रश्न - केळी प्रक्रिया उद्योगाचे काम का मार्गी लागत नाही?
उत्तर : टिश्यू कल्चरमुळे केळी आता कोठेही पिकू लागली आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेली, महागाईची केळी घेणे कोणी पसंत करणार नाही. त्यामुळे या उद्योगास कसा प्रतिसाद मिळेल, हा एक प्रश्न असल्याने त्यासाठी कोणी पुढे येण्यास तयार होत नाही. त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची केळी निर्यात कशी होईल, यासाठी आपला प्रयत्न राहणार असून त्यासाठी रावेर तालुक्यात अनेकजण तशी केळी विकसितही करीत आहे.
प्रश्न - केळीवर अवलंबून न राहता इतर पर्यायाकडे केळी उत्पादकांनी वळले पाहिजे का?
उत्तर - नक्कीच. एक-दोन वर्षातून वादळ होऊन केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यासह पाण्याचा प्रश्न बिकट होत असल्याने केळी उत्पादकांनी दुसरा पर्याय निवडला पाहिजे. यात मक्यासारखे पिक तीन महिन्यात येते, त्याचाही विचार व्हावा.
प्रश्न - टेक्सटाईल पार्कचे काय झाले?
उत्तर - हा मुद्दा राज्य सरकारशी निगडीत असल्याने त्या विषयी गिरीश महाजन हे अधिक माहिती देऊ शकतील.
प्रश्न - या वेळीही गाव दत्तक योजनेचे काही नियोजन आहे का ?
उत्तर - अद्याप तसे नियोजन नाही. गाव दत्तक योजनेत लोकसहभाग आवश्यक आहे. या योजनेत केवळ पैसा येणार असे नाही. सर्वांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा होतो. या विषयी जिल्हाधिकाºयांना ६ जून रोजी पत्र देणार आहे.
प्रश्न - ‘पॉस’मुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अडचणी येत असल्याने त्यावर काय उपाययोजना करणार?
उत्तर - डोंगराळ भागात नेटवर्कच्या अडचणी येत असल्याने गेल्या वर्षी त्या भागात ६० टॉवर मंजूर केले आहेत. या सोबतच मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील ग्रामपंचायत आॅनलाईन जोडल्या आहेत. आता यावल, चोपडा, जामनेर, भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायत जोडणार आहेत.
प्रश्न - नदी खोलीकरणाने पाण्याच्या प्रश्नावर मात शक्य होईल का?
उत्तर - हो, ते शक्य आहे. तशी कामे काही ठिकाणी सुरूदेखील आहेत. त्याचा फायदा पाण्याची पातळी वाढण्यास नक्की होऊ शकतो.
जामनेरला जावून पंगतीचा लाभ घेऊ
लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर तालुक्यापेक्षा जामनेर तालुक्यातून अधिक मताधिक्य देऊ, ही पैज जलसंपदामंत्री गिरीश महाजन हरले आहेत, या मुद्यावर रक्षा खडसे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आता जामनेरला जाऊन पंगतीचा लाभ घ्यावा लागेल. अर्थात तो एक गंमतीचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘ती’चा टक्काचे आवर्जून वाचन
‘लोकमत’च्या मंगळवारी प्रसिद्ध होणाºया ‘सखी’ पुरवणीमध्ये ४ जून रोजी सतराव्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातून आठ महिला खासदार निवडून आल्याचे वृत्त ‘ती’चा टक्का वाढला या मथळ््याखाली प्रसिद्ध केले आहे. त्यात खान्देशातील दोनही खासदारांचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले असून या पुरवणीचे खासदार रक्षा खडसे यांनी वाचन करून त्यास दादही दिली.