जिल्हा परिषद आरोग्य विभागात मेगाभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:54 AM2020-06-09T11:54:33+5:302020-06-09T11:54:56+5:30
जळगाव : कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने सुसज्जता म्हणून वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध ...
जळगाव : कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने सुसज्जता म्हणून वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध पदांची भरती करण्याचे ठरवले असून त्यासंदर्भात जाहीरातही प्रसिध्द केली आहे. पालिकेतर्फे वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्सच्या पदांसाठी ०९ ते ११ जून यादरम्यान मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे एकूण ५४२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांबाबतच्या मुलाखती १० जून रोजी घेण्यात येणार आहेत.
‘अनलॉक’चा तिसरा टप्पा सुरु झाला असला तरी कोरोनाचा फैलाव थांबलेला नाही. कोरानाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाउनच्या काळातही बाजारपेठेतील गर्दी थांबलेली नव्हती. कोरोनाचा प्रसार वाढत असताना आरोग्य यंत्रणा कोठेही कमी पडू नये, यासाठी पालिका आणि जिल्हा परिषद सतर्क झाली असून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदभरती सुरु झाली आहे. एमबीबीएस वा बीएएमएस तरूणांकडून वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागवले असून स्टाफ नर्स या पदासाठीही जाहीरात काढण्यात आली आहे. या पदांसाठी ०९ ते ११ जून या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत आयुक्त कार्यालय, महानगरपालिका येथे मुलाखत घेतली जाणार आहे.
पालिकेबरोबरच जिल्हा परिषदेनेही राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कोविड-१९च्या धर्तीवर महाभरती सुरु केली आहे. याबाबतच्या मुलाखती १० जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. या महाभरतींतर्गत फिजिशिअनची १६ पदे, भूलतज्ज्ञांची १४, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)ची ४६, आयुष वैद्यकीय अधिकारी ३२, हॉस्पिटल व्यवस्थापक २१, स्टाफ नर्स ३१६, एक्स-रे तंत्रज्ञ १२, ईसीजी तंत्रज्ञ-८, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-४, फार्मासिस्ट-२५, स्टोअर आॅफिसर २१, डाटा एन्ट्री आॅपरेटर २७ अशी पदे भरली जाणार आहेत.