विसर्जनानंतर मेहरुण तलाव चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:19 PM2020-09-03T12:19:18+5:302020-09-03T12:19:28+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण आणण्यात यश : ३० टन निर्माल्य संकलन ; मनपाच्या आवाहनाला नागरिकांची साथ

Mehrun Lake shines after immersion | विसर्जनानंतर मेहरुण तलाव चकाचक

विसर्जनानंतर मेहरुण तलाव चकाचक

googlenewsNext

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळी गर्दी होवू नये म्हणून मनपाने मूर्ती संकलनाचा उपक्रम राबवित विसर्जन स्थळी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. शहरात मनपाने तयार केलेल्या विविध २६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रावर तब्बल ४८ हजार मुर्तींचे संकलन झाले. त्यामुळे यंदा मेहरूण तलाववर नेहमी होणारी गर्दी झाली नाही. नागरिकांनी मनपाच्या आवाहनाला साथ देत घरगुती गणेश मूर्ती आपआपल्या भागातील संकलन कें्रद्रात जमा करत, विसर्जनस्थळी जाणे टाळत कोरोनाच्या लढाई विरोधात प्रशासनाच्या खांद्याला खांदा देण्याचे काम जळगावकर नागरिकांनी केले. याचा चांगला परिणाम म्हणून मेहरुण तलाव परिसर दुसऱ्या दिवशी चकाचक होता.


गेल्या पाच महिन्यांपासून नागरिक व प्रशासनाचा कोरोना विरोधात लढा सुरु आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी गणेशोत्सव काळात काही नियम लागू करत शासनाने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली. मात्र, विसर्जनाच्या दिवशी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होवून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती लक्षात घेता. मनपा प्रशासनाने नागरिकांना थेट मेहरूण तलावात मूर्ती विसर्जनास न जाता आपआपल्या भागातील मनपाने काही सामाजिक संस्थाच्या सहकार्याने तयार केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेश मूर्ती संकलित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत नागरिकांनीही यंदा मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती संकलीत केल्या. यामुळे मेहरूण तलावाच्या ठिकाणी बºयाच प्रमाणात गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात मनपाला यश मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.


मेहरूण तलाव परिसर चकाचक
गणेश विसर्जनानंतर दुसºया दिवशी मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य पडलेले आढळून येते. यामुळे तलाव परिसर पुर्णपणे अस्वच्छ झालेला आढळून येतो. मात्र, यंदा मनपाकडून मूर्ती संकलन केंद्रावरच निर्माल्य संकलन करण्यात येत होते. तसेच विसर्जनस्थळी देखील निर्माल्य संकलन करण्यासाठी ३० ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे बुधवारी मेहरूण तलाव व गणेश घाट परिसरात स्वच्छता दिसून आली.


मनपा अधिकारी मेहरूण तलाव परिसरात ठाण मांडून
विसर्जनाच्याठिकाणी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, आरोग्य अधिकारी पवन पाटील, उदय पाटील यांच्यासह इतर अधिकारी सकाळपासून ठाण मांडून होते. विविध सामाजिक संस्थानीही मनपाच्या आवाहनाला साथ देत मूर्ती संकलन केंद्र तयार केले होते.

क्रेनमध्ये साप निघाल्याने विसर्जनस्थळी धावपळ
गणेश विसर्जनादरम्यान, मंगळवारी मेहरूण तलावाच्या गणेश घाटाजवळील क्रेनमध्ये साप निघाल्याने विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांची धावपळ उडाली. मात्र, विसर्जनस्थळी उपस्थित सर्पमित्रांनी तत्काळ सर्पाला पकडून सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर गणेश घाटालगतच्या पाण्यातच अनेक सर्प असल्याने गणेश भक्तांना विसर्जजनापासून लांबच ठेवण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय अंतर्गत वन्यजीव संस्थेची जीवरक्षक, आणि ग्रीन सोल्जर टीमने आपली सेवा बजावली. तलावातच वास्तव्य असणारे दिवड जातीचे बिनविषारी ६ साप आढळून आले. त्यामुळे तलाव परिसरात काही प्रमाणात गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकच भितीने घाटापर्यंत न जाता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे मूर्ती देत होते. त्यातच मुर्ती विसर्जित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या क्रेन मध्ये मोठा सापआढळल्याने काही वेळ विसर्जन थांबविण्यात आले. त्यानंतर वन्यजीव संस्थेची टीम गणेश घाटावर उपस्थित होती. यातील सुरेंद्र नारखेडे, अमन गुजर तात्काळ दाखल झाले पाहणी केली असता हा साप तस्कर जातीचा बिनविषारी साप क्रेनमध्ये लपून असल्याचा आढळून आला २० मिनिटात सुरक्षितरित्या या सापाला वाचविण्यात आले. लगेच सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले

यांनी घेतले परिश्रम
मेहरुण तलाव परिसरात सापांचा अधिवास आहे. त्यामुळे तिथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनाही बोलावण्यात आले होते. यामध्ये पट्टीचे पोहणारे, प्रशिक्षित स्कुबा डायव्हर ,सर्पमित्र, रक्तदाते सहभागी झाले. संस्थेतर्फे संस्थाध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, योगेश गालफाडे, राहुल सोनवणे, निलेश ढाके, वासुदेव वाढे, अमन गुर्जर, दिनेश सपकाळे, प्रसाद सोनवणे, ज्ञानेश्वर सपकाळे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, विनोद बुवा, रितेश भोई, दुर्गेश आंबेकर,भरत सपकाळे,कृष्णा दुर्गे, सुरेंद्र नारखेडे, बापू कोळी, आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिह रावळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Mehrun Lake shines after immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.