कधीही गोडवा न जाणारी मेहरूणची बोरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:45+5:302021-01-14T04:13:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी केळीसोबतच जळगावची ओळख ही मेहरूणच्या बोरांव्दारे देखील होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा हा केळीसाठी प्रसिध्द असला तरी केळीसोबतच जळगावची ओळख ही मेहरूणच्या बोरांव्दारे देखील होत असते. मुंबई-पुण्याच्या नातलगांना थंडीच्या दिवसात हमखास देण्याचा खाऊ म्हणजे मेहरुणची बोरं आहेत. आजच्या वाढत जाणाऱ्या सिमेंटच्या जंगलात बोरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असली तरी जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये या बोरांची झाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत. कधीही गोडवा न जाणारी बोरं असे आगळे-वेगळे गुणधर्म या बोरांचे आहेत. त्यामुळे या बोरांना राज्यभर मागणी असते.
नोव्हेंबर महिन्यात बोचऱ्या थंडीसोबतच मेहरुणच्या बोरांचा हंगाम सुरु होतो. जानेवारी महिन्यानंतर या बोरांचा हंगाम संपतो. मात्र, तीन महिन्यातील हंगामात मेहरूणच्या बोरांना बाजारात मोठी मागणी असते. मेहरूण शिवारासह आव्हाणे, वावडदा, खेडी. वडनगरी या भागात देखील या बोरांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मेहरूणच्या बोरांची लागवड जिल्ह्यात मध्ययुगीन काळापासून होत असल्याचा उल्लेख जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये करण्यात आला आहे. सुरुवातीला मेहरूण गावाच्या शिवारात लागवड होणाऱ्या या बोरांचा विस्तार तालुक्यातील ठरावीक गावांमध्येच झाला आहे. पूर्वापार असलेली बोरीची झाडेही तोडली गेली असून, या वाणाचे संरक्षण होण्याची गरज निर्माण झाली आहे. हे वाण शहराच्या आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी लावल्यामुळे त्यांनी शहरात विक्रीसाठी आणलेल्या बोरांनाच मेहरूणची बोरे म्हटले जाते.
‘मेहरुण’ च्या बोरांना तोड नाही
आधुनिक काळात शेतीच्या पिकांपासून ते फळांपर्यंत अनेक बदल झाले आहे. फळांचे नैसर्गिक गुणधर्म काढून नवनव्या जाती तयार केल्या जात आहेत. मात्र, या जातींना नैसर्गिक गुणधर्म असलेल्या फळांची तोड येत नाही. सध्या बोरांची नवी जात आली आहे. आकाराने मोठे आणि सफरचंदासारखे असल्यामुळे या बोराला ॲपल बोर म्हटले जाते. मात्र मेहरूणच्या बोरांचा गोडवा त्यात नाही, असे जाणकारांचे मत आहे. यासह जिल्ह्यात श्याम, कट बोरं देखील मिळतात मात्र त्यांचे गुणधर्म मेहरूणच्या बोरांपेक्षा वेगळे आहेत. मेहरुणच्या बोरांना मात्र तोडच नाही.