मेहरुण चौपाटीवर उभारले गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:18 PM2019-11-19T21:18:30+5:302019-11-19T21:19:08+5:30
इतर ठिकाणचे गतिरोधक काढले : वाहनधारकांना करावी लागते कसरत
जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानुसार शहरातील रस्त्यांवरील सर्व गतिरोधक काढण्याचा सूचना मनपाला देण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिका प्रशासनाने मध्यवर्ती भागातील गतीरोधक काढण्याव्यतिरीक्त इतर कॉलनी व उपनगरांमधील गतीरोधकांकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच मनपाने आता मेहरूण तलावाच्या चौपाटीलगत असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे गतीरोधक उभारण्यात आले असून, हे गतीरोधक टाकताना कोणत्याही नियमांचे पालन देखील मनपाकडून करण्यात आलेले नाही.
शहरात मनपाकडून उभारण्यात ८५० गतिरोधक उभारण्यात आल्याची नोंद होती. मात्र, सर्व गतिरोधक अनधिकृत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकाराखाली काढल्यानंतर याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत केली होती. याच तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला शहरातील सर्व गतीरोधक काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, मनपा प्रशासनाने मध्यवर्ती भागातील रस्त्यावरील गतीरोधकाव्यतिरीक्त इतर भागातील गतिरोधक काढलेले नाहीत. शहरातील सर्व गतिरोधक अनधिकृत असताना दुसरीकडे मनपा प्रशासनाकडून मेहरूण तलावलगत असलेल्या रस्त्यावर गतिरोधकउभारल्यामुळे जिल्हाधिकाºयांचाच आदेशाची पायमल्ली मनपाकडून होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
समितीच नसताना गतिरोधकांना परवानगी कशी ?
गतीरोधक तयार करताना आयआरसी (इंडियन रोड कॉँग्रेस) च्या नियमांनुसारच काम व्हायला हवे, गतीरोधक टाकण्याची परवानगी ही जिल्हा गतीरोधक समितीकडून घेतली जायला हवी, मात्र जिल्ह्यात तशी कोणतीही समिती अस्तित्वातच नसल्याने मनाप्रमाणेच गतिरोधक टाकले जात असल्याचेही समोर आले आहे. एका गतिरोधकाची उंची १० सेंटी मीटर तर लांबी ३.५ मीटर इतकी पाहिजे. मेहरुण तलाव भागात असलेल्या गतिरोधकांची उंची मनाप्रमाणे केली आहे. शहरातून गतिरोधक काढले जात असताना इथे मात्रे ते कुणाच्या परवानगी टाकले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉलनीमधील गतिरोधक काढायला हरकत काय ?
महापालिकेला जिल्हाधिकाºयांनी आदेश देवून देखील शहरातील सर्व गतिरोधक काढलेले नाहीत. मध्यवर्ती भागातील गतिरोधक मनपाने अवघ्या दोन दिवसातच काढले. मात्र, कॉलनी व उपनगरांमधील गतिरोधक काढण्यास महापालिका प्रशासनाला काय हरकत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत मनपा बांधकाम विभागाचे अभियंता सुनील भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. शहरातील अनेक कॉलन्यांमध्ये मागणी नसताना मनपाने अनेक ठिकाणी आणि दहा ते १५ फूटावर गतिरोधक टाकले आहेत. आता तिथले गतिरोधक कधी काढले जातात, याची प्रतीक्षा आहे.
मोठ-मोठ्या
दगडांचा वापर
गतिरोधक तयार करताना डांबर व खडीचा वापर केला जातो. मात्र, या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांमध्ये मोठ-मोठ्या गतीरोधकांचा वापर करण्यात आला आहे. तसेच गतीरोधकांची उंची देखील जास्त असल्याने मोटारसायकल चालकाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. एकूण नऊ गतिरोधक असून, सर्व गतिरोधकांची उंची सारखीच आहे. दरम्यान, या रस्त्यावर महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवितात त्यामुळे हे गतिरोधक टाकण्यात आल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. मात्र, गतिरोधक टाकल्यामुळे अपघातांचीच जास्त भिती व्यक्त केली जात आहे. या गतिरोधकामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो, अशी स्थिती सध्या मेहरुण तलाव परिसरात पहायला मिळत आहे.