अनुदानानंतरही नसबंदीला पुरुषांचा प्रतिसाद मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 10:22 PM2020-10-04T22:22:02+5:302020-10-04T22:25:01+5:30
लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे,
(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)
जामनेर : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे, तर दुसरीकडे ५० महिलांवर कुटुंंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गैरसमजुतीने पुरुष नसबंदीसाठी धजावत नाहीत. पुरुषांची ही मानसिकता बदलून ते नसबंदीसाठी पुढे यावेत म्हणून शासनाने १ हजार ४०० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आह.े कौटुंबिक व सामाजिक दबावातून म्हणावा तसा पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस तालुक्यात प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षभरात तालुक्यात एकाही पुरुषाने नसबंदीची शस्त्रक्रिया केली नाही, तर दुसरीकडे महिलांच्या शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाला २२०० शस्त्रक्रियेची उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे आठ महिन्यामध्ये ५० महिला कुटुंंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पुढे आल्या आहेत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना ६०० रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान दिले जाते. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना ६०० रुपये तर इतर महिलांना २५० रुपयांचे अनुदान देण्यात येते. आरोग्य विभागाच्या अहवालावरून वर्षभरात तालुक्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालय, पहूर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२०० उद्दिष्टांपैकी आठ महिन्यात कोरोना माहामारीमुळे ५० महिलांवर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांनी दिली.
दरम्यान, खरे तर पुरुष नसबंदी ही चांगली व कमी वेळेत विना त्रास देणारी शस्त्रक्रिया आहे. याबाबत कोणताही गैरसमज मनात न ठेवता पुरूषांनी नसबंदीसाठी पुढे यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे.
तीन वर्षात सात पुरुषांनी केली नसबंदी
पुरुष नसबंदीबाबत समज-गैरसमजामुळे तालुक्यात गेल्या तीन वर्षात फक्त सात पुरुषांनी नसबंदी केली आहे. मात्र पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत, असेही कुणाला वाटत नाही. पूर्वी तांबीबाबतही खूप जाहिरात होत असे. अगदी सरकारी बक्षिसेही दिली जात. मूल नको असेल तर तांबी बसवा, जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढा, बाकी मुद्दे जनतेपर्यंत नीटपणे पोचवले जात नाहीत. पुरुष नसबंदीही अशीच साधीसोपी असावी, असा अनेकांचा समज करून दिला जातो. म्हणूनच याबाबतीतल्या सर्व उलटसुलट मुद्यांची जाणीव करून देणाऱ्या लोकशिक्षणाची गरज आहे.