कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची पुरुषांना भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:17+5:302021-02-07T04:15:17+5:30
जिल्ह्याची स्थिती : न्यूनगंडासह अनेक गैरसमजांमुळे पुरुषांमध्ये उदासीनता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या बाबतीत पुरुषांमध्ये असलेली ...
जिल्ह्याची स्थिती : न्यूनगंडासह अनेक गैरसमजांमुळे पुरुषांमध्ये उदासीनता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या बाबतीत पुरुषांमध्ये असलेली भीती व प्रचंड उदासीनता यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांत केवळ तीन पुरुषांनीच नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. यात विशेष बाब म्हणजे २०२० मध्ये तर एकही पुरुष यासाठी पुढे आलेला नाही. त्या तुलनेत ७२५ महिलांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे आताही महिलांवरच ही जबाबदारी टाकली जात असल्याचे विदारक चित्र आहे.
डॉक्टरांकडून माहिती घेतली असता, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही महिलांच्या तुलनेत पुरुषांसाठी सोपी असते. महिलांची ही शस्त्रक्रिया किचटत असते. शिवाय, या शस्त्रक्रियेनंतर कुठलेही शारीरिक व्यंग येत नाही, असे असूनही पुरुषांचे प्रमाण अत्यंत कमी असून महिलांचे प्रमाणच यात अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाभरातही हे प्रमाण अगदीच कमी असल्याचे चित्र आहे. अनेकदा जनजागृती, समुपदेशन करूनही ही संख्या वाढत नसल्याची माहिती आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये अशा शस्त्रक्रिया या विनामूल्य करण्यात येतात. यात २०२१ च्या दोन महिन्यांत ५० महिलांची ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यातही एकाही पुरुषाचा समावेश नाही.
एक नजर शस्त्रक्रियांवर
वर्ष २०१९
५६५ महिलांनी केली शस्त्रक्रिया
३ पुरुषांनी केली नसबंदी
२०२०
१६० महिलांनी केली शस्त्रक्रिया
यावर्षी एकही पुरुषाने नसबंदी केली नाही
काय आहेत गैरसमज
नसबंदी केल्यानंतर आपले पौरुषत्व धोक्यात येईल. शिवाय, आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल, असे अनेक गैरसमज या शस्त्रक्रियेच्या बाबतीत पुरुषांमध्ये असतात. शिवाय, एक न्यूनगंडाची भावनाही असतेच, त्यामुळे पुरुष या शस्त्रक्रियांसाठी पुढे येत नसल्याची माहिती आहे.
कोट
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही महिलांच्या तुलनेत पुरुषांसाठी अधिक सोपी असते. यामुळे कोणत्याही प्रकारे शारीरिक परिणाम होत नाही. मात्र, आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल, यामुळे महिलांवरच ही जबाबदारी टाकली जाते.
- डॉ. संजय बनसोडे, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, जीएमसी
कोट
आयुष्यात नसबंदी ही अत्यावश्यकच आहे, असे वाटत नाही. काळानुरूप अनेक सुविधा येत आहे. त्यामुळे ती गरजेचीच आहे, असे मला वाटत नाही. - एक पुरुष
कोट
महिलांवरही याचे बंधन नको. पती, पत्नी यांचा जिव्हाळा, सुशिक्षितता असेल, तर यावर समन्वयाने मार्ग काढला जावा. - एक पुरुष