महिलांप्रमाणे पुरुषांनाही कायद्याचे संरक्षण द्यावे - जळगावात ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:01 PM2018-11-26T13:01:43+5:302018-11-26T13:02:13+5:30
पुरुष हक्क समितीच्या अधिवेशात ४ महत्त्वपूर्ण ठराव
जळगाव : महिलांना ज्या प्रमाणे कायद्याचे संरक्षण आहे, त्याच प्रमाणे पुरुषांनाही देण्यात यावे, पुरुषांनाही पोटगी मिळावी, पुरुषांचा तेजोभंग झाल्यास स्त्रियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पुरुष आयोग स्थापन करावा असे चार महत्त्वपूर्ण ठराव पुरुष हक्क संरक्षण समितीच्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आले. हे ठराव सराकारनेही मंजूर करावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचेही ठरले.
जळगावात आयोजित दोन दिवसीय अधिवेशाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. राज्यअध्यक्ष डॉ. सुनिल घाडगे, सचिव अॅड. धर्मेद्र चव्हाण (नाशिक), समन्वयक अॅड.बाळासाहेब पाटील (सांगली), जिल्हाध्यक्ष अॅड. जयेश भावसार , अॅड. मधुकर भिसे (धुळे) आदिंची मुख्य उपस्थिती होती.
अधिवेशनात मंजूर झालेले ठराव
ठराव क्रमांक १- पुरुषाचा तेजोभंग या कलमाचा अंतर्भाव करावा
अलिकडच्या काळात अनेक स्त्रियांच्या राहणीमानात बदल झाला आहे. पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवतील इतके अध:पतन त्यांच्या वेशभूषेत झाले आहे. यामुळे पुरुषांचा वारंवार तेजोभंग होतो. मात्र याबाबत कोणतेही कलम नाही. स्त्रिचा विनयभंग झाला तर ३४५ चा अंतर्भाव आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचा तेजोभंग झाल्यास स्त्रियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ३५४- अ असे कलम निर्माण करावे.
ठराव क्रमांक २- .... तर पुरुषालाही मिळवी पोटगी
पुरुषाने पत्नीचा विनाकारण त्याग केल्यास कलम १२५ अन्वये पत्नीला पोटगी द्यावी लागते. दरम्यान अलिकडे काही स्त्रिया या पुरुषांना कोणतेही कारण नसताना मुलाबाळांसहीत परित्याग करतात. वैवाहिक सुख देण्यास नकार देतात. अशा स्त्रियांना चपराक बसण्यासाठी त्या पुरुषाचे पुन्हा लग्न होईपर्यंत त्यास अशा पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी १२५- अ या कलमाची निर्मिती करावी.
ठराव क्रमांक ३- घरगुती हिंसाचार कायद्यात दुरुस्ती करावी
घरगुती हिंसाचार कायद्यातील काही कलमांमुळे पुरुषांवर अन्याय होण्याची भिती अधिक आहे. या कायद्यात पुरुषांना आपली बाजू मांडण्यास वाव नाही. यामुळे काही चारित्र्यहीन, अहंकारी स्त्रिया या कायद्याचा दुरुपयोग करीत आहेत.त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती करावी.
ठराव क्रमांक ४- पुरुष आयोग नेमावा
महिलेस अबला मानून महिला आयोग, महिला दक्षता समिती, मोफत कायदा सल्ला आदींचे पाठबळ त्यांना देण्यात आले. परंतु आता महिला शिक्षणामुळे व आर्थिक स्थितीमुळे अबला राहिल्या नसून बऱ्याचदा कायद्याचा दुरुपयोग पुरुषांविरुद्ध त्या करतात. यामुळे पुरुषांना न्याय देण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करुन जिल्हास्तरावर पुरुष दक्षता समित्यांची स्थापना करण्यात यावी.
पुरुषमित्र पुरस्काराने गौरव
चांगले कार्य केल्याबद्दल नारायण मोरे (नाशिक), विलास देवरकर (गणपतीपुळे), रवींद्र दरक (नागपूर) यांना यंदाचा पुरुषमित्र पुरस्कार देण्यात आला.