भाजपातील बेबनाव मिटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 04:32 PM2019-03-01T16:32:56+5:302019-03-01T16:33:01+5:30
आपसातील वाद चव्हाट्यावर
हिंतेंद्र काळुंखे
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असून सत्ताधारी गटातील बेबनावामुळे पक्ष तसेच पदाधिकाऱ्यांवर नामुष्की ओढवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचा या कोणावरही कंट्रोल नसल्याचेच दिसून येते.
काही महिन्यांपूर्वीच सर्वसाधारण सभेत स्वकीय सदस्यांनीच बंड पुकारल्याने जिल्हा नियोजनकडून प्राप्त १२० कोटींच्या मंजूर विषयाच्या इतिवृत्तीला विरोध होेऊन हा विषय बारगळला होता. सत्ताधारी गटाची व पक्षाचीही यामुळे नामुष्की झाल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पदाधिकारी आणि सर्व सत्ताधारी सदस्यांची बैठक घेवून समजोता घडवून आणला. आणि सदस्यांच्या मागणीनुसार समान निधी वाटपासाठीच्या ठरावाला मंजुरीसाठी ११ रोजी विशेष सभा घेतली गेली. हा प्रकार तेव्हा मिटविला गेला तरी नुकताच पुन्हा असाच प्रकार घडला. दरम्यान अशा प्रकारे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यातील बेबनाव तसेच गटबाजीमुळे आतापर्यंत कामांचे नियोजनावर परिणाम होत आला आहे. एवढेच नाही तर पदाधिकारी आणि सदस्यांमधील अशा वादामुळे अधिकाऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. यामुळेच त्यांना फावले असून अधिकाऱ्यांवरही कोणाचा वचक राहिलेला नाही.
नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपातील बेबनाव पुढे आला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी अतिरिक्त कामांना मंजुरीबाबत सिंचन विभागाला सूचना दिल्याच्या निर्णयास सत्ताधारीच काही सदस्यांनी या सभेत विरोध केला. एकीकडे भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे, असे म्हटले जात असताना जि. प. अध्यक्षांच्या निर्णयाला अधिकाºयांकडे पत्र देवून किंवा पक्ष नेत्यांपुढे अथावा जिल्हाध्यक्षांकडे हा विषय मांडून आपसात प्रश्न सोडवायला हवा होता. परंतु तसे कधीही न होता आपसातील वाद हे नेहमीच चव्हाट्यावर येवू लागले आहेत. कोणीच ऐकण्यास तयार नाही, असेच या घटनांमधून दिसत आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची हतबलताही समोर येते.