व्यापारी व वायरमनची दुचाकी चोरट्यांनी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:28+5:302021-05-15T04:15:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी कंपनीत कामाला आलेल्या वायरमनची तर गुरूवारी घाणेकर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारी कंपनीत कामाला आलेल्या वायरमनची तर गुरूवारी घाणेकर चौकात काही कामानिमित्त आलेल्या व्यापाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविली
ममुराबाद येथील रहिवासी मनू तुकाराम बोरसे हे अजिंठा चौफुली परिसरातील एका कंपनीत वायरमन म्हणून कामाला आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने (एमएच १९ एझेड ९५९७) निघाले. ९ वाजता कंपनीत आल्यानंतर त्यांनी पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली व कंपनीत निघून गेले. सायंकाळी ५ वाजता कंपनीच्या बाहेर आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर दिसली नाही. बोरसे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यापाऱ्याची दुचाकी तरूणाने नेली चोरून...
व्यापारी अझर खान हे फालक नगरात राहतात. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ते घाणेकर चौकात काही कामानिमित्त दुचाकीने (एमएच १९ एफ १५८६) आले होते. मात्र, त्यांची दुचाकी विनेश चंपालाल बंडोर (२७, रा.अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवाणी) या तरूणाने चोरून नेली. याबाबत अझर खान यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अजय पाटील करत आहेत.