व्यापारी संकुल पुन्हा गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:06 PM2020-08-06T13:06:26+5:302020-08-06T13:06:41+5:30
जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले ...
जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील व्यापारी संकुल बुधवार, ५ आॅगस्टपासून पुन्हा उघडून थेट ग्राहकांसाठी खुले झाले. यामुळे साडे चार महिन्यांपासूनची तसेच १५ दिवसांपासून केवळ आॅनलाईन व्यवसायाच्या परवानगीची चिंता दूर झाली आहे. तब्बल १३६ दिवसांनतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यापारी संकुल सुरू होताच ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग दिसून आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर संकट उभे राहण्यासह अर्थचक्रही मंदावले. चार महिन्यांच्या काळात महत्त्वाचे सण, उत्सव निघून गेल्याने माल भरून ठेवला असतानाही व्यवसाय करू शकत नसल्याने व्यापारी बांधव हतबल झाले होते. इतर व्यवसायांना परवानगी मिळत असताना केवळ संकुलातील दुकाने बंद असल्याने यासाठी संकुलांमधील व्यापारी बांधवांसह विविध व्यापारी संघटनांनी ही संकुले सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले.
दुकाने सुरू होण्यासाठी पाठपुरावा
गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी संकुलांना परवानगी मिळत नव्हती. त्यात २० जुलैपासून काही निर्बंधांसह ही संकुले सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यात लहान संकुलांमधील दुकाने सम-विषम प्रमाणे उघडण्यात आली. मात्र मोठ्या मार्केटमधील दुकानांना केवळ दुपारी १२ ते ४ दरम्यान, होम डिलिव्हरी किंवा आॅनलाईन व्यवसायाची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तब्बल १३६ दिवसांनंतर थेट ग्राहकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
अर्थचक्राला येणार गती
शहरातील बहुतांश व्यापार हा व्यापारी संकुलांमध्ये असल्याने ते सुरू झाल्याने आता शहराच्या अर्थचक्रालाही अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तीन दिवस बंद, मार्ग निघणार
व्यापारी संकुल सुरू झाले, याचे समाधान आहे. मात्र ते सप्ताहातील तीन दिवस बंद राहणार असल्याने याचीही चिंता आहे, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मात्र यावरही तोडगा निघेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्राहक देवो भव:.... बुधवार, ५ आॅगस्ट रोजी व्यापारी संकुल सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनी भगवंताचे नामस्मरण करीत शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होऊन असे संकट पुन्हा न येवो, अशी प्रार्थना केली. दुपारी ग्राहकांचीही खरेदीसाठी लगबग असल्याचे दिसून आले. दुकानांमध्ये ग्राहक येताच अनेक दुकानदारांनी ‘ग्राहक देवो भव:’च्या उक्तीप्रमाणे त्यांचे स्वागत केले.