संकुल सुरू होण्याची व्यापाऱ्यांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:37 PM2020-07-02T12:37:50+5:302020-07-02T12:38:05+5:30

नवीन आदेशातही परवानगी नाही : सलूनवर वेटींगला बंदी, अंत्यविधीच्या उपस्थितीवर निर्बंध

Merchants waiting for the package to start | संकुल सुरू होण्याची व्यापाऱ्यांना प्रतीक्षाच

संकुल सुरू होण्याची व्यापाऱ्यांना प्रतीक्षाच

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आले असून यामध्ये जळगाव शहर व जिल्ह्यात राज्य सरकारने दिलेले जवळपास बहुतांश आदेश लागू राहणार आहेत.
मात्र अंत्यविधीसंदर्भातील राज्य सरकारच्या आदेशात काहीसा बदल करीत अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी राहणार आहे. तसेच सलूनच्या दुकानावर रांगा लावून बसण्यास (‘वेटिंग’) बंदी घालण्यात आली असून वेळ घेऊन केशकर्तनासाठी यावे लागणार आहे. नवीन आदेशात शहरातील व्यापारी संकुलाबाबत निर्णय झाला नसून ते सुरू होण्याबाबत व्यापाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन सहाबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानंतर जिल्ह्यासंदर्भातीलही आदेश १ जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले. यामध्ये सर्व बाजार, दुकाने व सध्या सुरू असलेले इतर व्यवहार सुरूच राहणार आहेत.

अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी
राज्य सरकारने अंत्यविधीसाठी ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र अंत्यविधीसाठी जिल्ह्यात केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रात्री ९ ते पहाटे ५ यावेळेत जमावबंदी
रात्री ९ ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहणार आहे. रात्री ९ ते पहाटे ५ यावेळेतही जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू असणार आहे.

‘नो वेटिंग’
सलून दुकाने सुरू करण्याची या पूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता या ठिकाणी ग्राहकांना बसून राहता येणार नाही. दुकानदारांकडून वेळ घेऊन त्या वेळी कटिंगसाठी दुकानावर यावे लागणार आहे.

व्यापारी संकुलाबाबत लवकरच निर्णय
शहरातील व्यापारी संकूल सुरू होण्यासंदर्भात अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. राज्य सरकारनेच तशी परवानगी दिलेली नाही. मात्र शहरातील व्यापारी संकुलांसंदर्भात दोन-तीन दिवसात निर्णय होण्याचे संकेत दिले जात आहे. या संदर्भात मनपा व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने स्थानिक पातळीवरील निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तसेच सलूनच्या दुकानावर ‘वेटिंग’ करता येणार नाही. वेळ घेऊन त्यावेळीच ग्राहकांना दुकानावर यावे लागेल.
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
 

Web Title: Merchants waiting for the package to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.