जळगाव शहराचा पारा ४० अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:25+5:302021-03-29T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन दिवसांत शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून, रविवारी शहराचा पारा ४० अंशांपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन दिवसांत शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून, रविवारी शहराचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला होता. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानात मोठी वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा ४० अंशांपर्यंत गेला असल्याने यंदाचा उन्हाळा जळगावकरांना चांगलाच चटका देणारा ठरेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
जागतिक हवामान बदलामुळे ऋतुमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या सरासरीत ३० टक्क्यांची वाढ, तर थंडीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात घट झालेली जाणवत आहे. यंदा पंधरा दिवसअगोदरच उन्हाची चाहूल लागली आहे, तसेच यंदाचा उन्हाळा जूनपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूू नये म्हणून प्रशासनाने तीन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहणे बंधनकारक आहे. मात्र, एकीकडे घरात राहण्याशिवाय पर्याय नसताना दुसरीकडे तापमानाचा पारा वाढत जात आहे. जळगाव शहराच्या तापमानाने चाळिशी पार केली. अशा परिस्थितीत घरात थांबणेही कठीण झाले आहे. त्यातच गारवा मिळावा म्हणून नागरिक कूलर व इतर साधनांचा वापर करीत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे कूलर व इतर साहित्यही खरेदी करता येत नसल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
रात्री ते दिवसाच्या तापमानात तब्बल २५ अंशांचा फरक
दिवसाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिवसा नागरिकांना उन्हाच्या अक्षरश: झळा बसत आहेत. मात्र, रात्रीचे तापमान १५ अंशांपर्यंत खाली घसरल्याने काही प्रमाणात वातावरणात गारवा कायम असतो. शहराच्या कमाल व किमान तापमानात तब्बल २५ अंशांचा फरक असल्याने या दुहेरी वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसताना दिसत आहे. दिवसा प्रचंड तापमान व रात्री गारवा अशा वातावरणामुळे सर्दी व तापेच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे शहरात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे दुहेरी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत आहे, तसेच ताप व सर्दी वाढल्याने अनेकदा कोरोना झाल्याची भीती नागरिकांमध्ये पसरत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात सरासरी तापमानात एक अंशांची वाढ होण्याची शक्यता
वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील ऋतुमानावर मोठा परिणाम झालेला असून, यंदाच्या उन्हाळ्यात सरासरी तापमानात एक अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत जळगाव शहराच्या कमाल तापमानाची सरासरी हे ४३ अंश असते. मात्र, यंदा ही सरासरी ४४ ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशांची वाढ झाली होती, तर यंदा उन्हाळ्यातदेखील ही सरासरी वाढण्याची शक्यता आहे.
अजून पाच दिवस उष्णतेची लाट ?
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे काही प्रमाणात तापमानात घट झाली होती. मात्र, पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे पुन्हा सक्रिय झाल्याने आगामी पाच दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पारा ४२ ते ४३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमानात फार काही वाढ होण्याची शक्यता नाही.
आगामी पाच दिवसांचे तापमान
तारीख - कमाल - किमान
२९ मार्च - ४० - १७
३० मार्च - ४१ - १८
३१ मार्च - ४२ - १९
१ एप्रिल - ४१ - १८
२ एप्रिल - ४२ - १९