मेश्राम यांच्या संकल्पनेतील ‘लॅब टू लॅण्ड’चा खान्देशातील शेतकऱ्यांना झाला सर्वाधिक लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:47+5:302021-03-16T04:16:47+5:30

जळगाव : ‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची एक वेगळीच ओळख निर्माण ...

Meshram's concept of 'Lab to Land' benefited the farmers of Khandesh the most | मेश्राम यांच्या संकल्पनेतील ‘लॅब टू लॅण्ड’चा खान्देशातील शेतकऱ्यांना झाला सर्वाधिक लाभ

मेश्राम यांच्या संकल्पनेतील ‘लॅब टू लॅण्ड’चा खान्देशातील शेतकऱ्यांना झाला सर्वाधिक लाभ

Next

जळगाव : ‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची एक वेगळीच ओळख निर्माण करणारे माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम (६५) यांचे सोमवारी नागपूर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. झोपडपट्टीतून उगवलेला ज्ञानसूर्य मावळल्याची भावना व्यक्त करीत त्यांना शिक्षण क्षेत्रातून आदरांजली वाहण्यात आली आहे.

तत्कालीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत काम केले. ते या विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नागपूरच्या अवंती रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल होते. सोमवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. ज्योत्स्ना मेश्राम आणि एक मुलगा, सून व नातवंड असा परिवार आहे.

अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू

प्रा. सुधीर मेश्राम यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या काळात नॅक पूनर्मूल्यांकनाच्या तिसऱ्या साखळीत विद्यापीठाला ‘अ’श्रेणी मिळाली. ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या त्यांच्या अभिनव उपक्रमात खान्देशातील शेतकऱ्यांना शाश्वत जैवतंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन तर मिळालेच परंतु शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला. विद्यापीठात त्यांच्या काळात विचारधारा प्रशाळेला प्रारंभ झाला. अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रमदेखील सुरू झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाशी सामंजस्य करार झाले. इंडिया टुडे, करिअर ३६० या नियतकालिकांनी केलेल्या सर्वेक्षणात उमविला देशात अनुक्रमे ४० वे व २७ वे स्थान प्राप्त झाले.

अन् विद्यापीठात माजी राष्ट्रपती डॉ़ ए.पी.जे.अब्दुल कलामांचे आगमन

नंदुरबार येथे आदिवासी अकादमी स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून प्राप्त केलेली २५ एकर जमीन ही त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची नमूद करण्यासारखी बाब आहे. मजूर पाल्य योजनादेखील विद्यापीठात त्यांनी राबविली. धुळे येथील महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र आणि अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे नूतनीकरण त्यांच्या कार्यकाळात झाले. विद्यार्थ्यांसाठीदेखील त्यांनी अनेक निर्णय घेतले़ त्यामध्ये वसतिगृहात इंटरनेट सुविधा, कमवा व शिका योजनेतील मानधनात वाढ, होस्टेल डे अशा काही उपक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभासाठी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, निती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांना प्रमुख अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले. याशिवाय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, हरितक्रांतीचे जनक प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांना डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली.

मेश्राम यांना श्रद्धांजली अर्पण

सोमवारी विद्यापीठात प्रा. सुधीर मेश्राम यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा. ए. एम. महाजन, प्रा. आर. जे. रामटेके, अरुण सपकाळे, भालचंद्र सामुद्रे यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनीदेखील आपला शोकसंदेश पाठविला. दरम्यान, माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या निधनामुळे मंगळवार, १६ मार्च रोजी विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे़

Web Title: Meshram's concept of 'Lab to Land' benefited the farmers of Khandesh the most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.