जळगावातील वसुंधरा महोत्सवात चित्रांद्वारे प्राणी संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:51 AM2017-12-09T11:51:07+5:302017-12-09T11:58:17+5:30
४ चित्रपटांचे सादरीकरण अन् नृत्याविष्काराने जिंकली मने
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.९ : वसुंधरा चित्रपट महोत्सवानिमित्त शुक्रवारी शहरातील गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग व चित्रकला स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी चेहºयांवर विविध प्राण्यांचे चित्र रेखाटून नामशेष होणाºया प्राण्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
शहरातील सात शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. चित्रकला स्पर्धेसाठी ‘ग्लोरी आॅफ बर्ड’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये पाचवी ते सातवी व आठवी ते नववी असे दोन गट पाडण्यात आले होते. तर फेस पेंटिंगसाठी पर्यावरण व निसर्ग हे दोन विषय देण्यात आले होते. या वेळी अभय उजागरे, राजेंद्र नन्नवरे, गुजरात येथील राजल पाठक, बाळकृष्ण देवरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाविश्वाचे दर्शन
निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे अनोखे दर्शन या वेळी पाहायला मिळाले. वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल, त्यामुळे पक्ष्यांचा हरवत चाललेला निवारा यावर लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून लक्ष वेधले. श्रवण विकास मंदिरातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनीही आकर्षक चित्र या वेळी रेखाटले. स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात येणार आहे.
सुरेश एल्मान यांच्या वाईल्ड पेरियार, रिटा बॅनर्जी यांच्या फ्लाइट टू फ्रीडम, ईशानी दत्ता यांच्या फेथ रिव्हिजिटेड व अमित गोस्वामी यांच्या क्रॉनिकल्स आॅफ अ वाईल्डलायफर या चित्रपटांचे सादरीकरण झाले. चित्रपट पाहण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमींनी गर्दी केली होती. रात्री वसुंधरा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १० शाळांमधील सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. यामध्ये लोकनृत्यासह विविध बॉलीवूड व आदिवासी नृत्याची झलक विद्यार्थ्यांनी दाखवली.