जामनेर येथे होली महोत्सवातून संस्कारशील देश घडविण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:46 PM2019-03-27T16:46:33+5:302019-03-27T16:46:49+5:30
प.पू. श्यामचैतन्यजी महाराज यांचे मार्गदर्शन
जामनेर : गुरूदेव सेवा आश्रमतर्फे आयोजित रंगपंचमी होली महोत्सवात प.पू. श्यामचैतन्यजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना सत्संगाद्वारे संस्कारशील देश घडविण्याचा मार्ग सांगण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
गुरूदेव सेवा आश्रमद्वारे सर्वप्रथम होली नृत्य (फाग) सादर करण्यात आले. त्यात बहुलखेडा, कन्नड, उप्पलखेडा, महादेवमाळ, शंकरपुरा, जामठी, गोंदेगाव तांडा, लिहा तांडा, मांडवा, आंबेवडगाव हिंगणे, कोकडी, यासह असंख्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंजारा समाजातील महिलांनी आपल्या पारंपारिक वेशभुषेतून तसेच होळी गीतातून होळीचे महत्त्व पटवून दिले. या फाग नृत्यात शेकडो पुरूषांनी, महिलांनी सहभाग घेतला.
फाग नृत्यात प.पू. श्यामचैतन्यजी महाराज यांनीही ठेका धरला, त्या वेळी उपस्थितांनीही या क्षणांचा आनंद घेतला. त्यानंतर प.पू.श्यामचैतन्यजी महाराज यांनी सत्संगाद्वारे व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुणहत्या, आत्महत्या, गुन्हेगारीकरण, निरक्षरता यावर जोरदार प्रहार करीत संस्कृती टिकवण्यासाठी होलीचे महत्त्व सांगितले. सोबतच रक्तदान व अवयवदानाचेही महत्त्व त्यांनी विषद केले.
यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, डॉ.नंदलाल पाटील, रवी महाजन, डॉ.सुभाष पवार, गणेश राठोड, मनोज जाधव, राधेश्याम राठोड, निमचंद चव्हाण, सुरेश चव्हाण, प्रफुल्ल पाटील, मनोज महाजन, अनिल वाघ, डॉ.प्रकाश चव्हाण, हेमराज चव्हाण, पुखराज पवार, विजू महाराज, भिलाजी महाराज, खेमराज महाराज, निमचंद चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव व असंख्य भाविकभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश चव्हाण यांनी केले तर अक्षय जाधव यांनी आभार मानले.